• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पत्नी माहेरी गेल्यानंतर घरात गळफास

Jun 7, 2025
पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्यापुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या : खडक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा गळफास घेऊन अंत; पत्नी व मुलगी माहेरी गेल्यानंतर उघडकीस आली घटना.

सायली मेमाणे

पुणे ७ जून २०२५ : पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या झाल्याची एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहर पोलिस दलातील सचिन हरीशचंद्र सुर्वे (वय 46) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील नवीन शिवनेरी बिल्डिंग येथे उघडकीस आली.

सचिन सुर्वे यांची खडक पोलीस ठाण्यात नेमणूक होती. ते पत्नी आणि मुलीसह शिवाजीनगर पोलिस वसाहतीत राहत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ते घरात एकटेच होते, कारण त्यांची पत्नी आणि मुलगी काही दिवसांसाठी माहेरी गेल्या होत्या. याच काळात त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले.

पोलीस घटनास्थळी पोहचताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेत ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या मृत्यूमुळे पोलीस विभागात शोककळा पसरली असून सहकाऱ्यांमध्ये दुःख व्यक्त केले जात आहे.

सचिन सुर्वे यांनी आत्महत्या का केली? त्यामागे कोणते वैयक्तिक, कौटुंबिक किंवा मानसिक कारण आहे का? याचा शोध घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. सध्या तरी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.

पोलीस दलात कार्यरत असलेल्याने आत्महत्या केल्याच्या घटनांमुळे मानसिक आरोग्याच्या बाजूने अधिक संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज अधोरेखित होते.