• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे-सोलापूर रस्त्यावर तब्बल 6500 कोटींचे चौपदरीकरण; टिळेकरांनी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या

Jul 14, 2025
पुणे-सोलापूर रस्त्यावर 6500 कोटींचा खर्च; हडपसर-यवत दरम्यान 25 किमीचा उड्डाणपूल पुणे-सोलापूर रस्त्यावर 6500 कोटींचा खर्च; हडपसर-यवत दरम्यान 25 किमीचा उड्डाणपूल

पुणे-सोलापूर रस्त्यावर 6500 कोटींचा खर्च; हडपसर-यवत दरम्यान 25 किमीचा उड्डाणपूल, मेट्रो, क्रीडांगण व सृष्टी प्रकल्पांसाठी राज्य सरकारची मान्यता.

सायली मेमाणे

पुणे १४ जुलै २०२४ : पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, राज्य सरकारच्या ‘एमएसआयडीसी’च्या माध्यमातून सुमारे 6500 कोटी रुपये खर्चाच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली आहे. या महामार्गावर हडपसर ते यवत दरम्यान तब्बल २५ किलोमीटरचा उड्डाणपूल प्रस्तावित असून, यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.

विधान परिषदेतील पुरवणी मागण्यांच्या सत्रात सदस्य योगेश टिळेकर यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना आणि मागण्या केल्या. त्यांनी यवतपर्यंतचा प्रस्तावित उड्डाणपूल हडपसरऐवजी भैरोबा नाला येथून सुरू करण्याची मागणी केली. अशा पद्धतीने झाल्यास मुंढवा, वानवडी, कोंढवा या भागांतील रहदारीचा भार कमी होईल आणि सोलापूर महामार्गावरील गर्दी नियंत्रणात येईल, असा दावा टिळेकर यांनी केला.

त्याचबरोबर, शहरात सुरू होणाऱ्या इतर विकास प्रकल्पांसंदर्भातही त्यांनी लक्ष वेधले. खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या मेट्रो मार्गांसाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून, शिवाजीनगर–कोंढवा–येवलेवाडी भागालाही या मेट्रो योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. मेट्रोचा जाळं विस्तारल्यास वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक पर्याय उपलब्ध होईल.

शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक विकासासाठीही त्यांनी काही मागण्या मांडल्या. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शासनाच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या नावाने भव्य सृष्टी उभारण्यात यावी, तसेच धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांची सृष्टी उभारण्याची सूचनाही त्यांनी दिली. महाज्योतीमार्फत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबतही टिळेकरांनी आग्रह धरला.

त्याचप्रमाणे, महंमदवाडी गावाचे नाव बदलून ‘महादेववाडी’ असे करावे अशी स्थानिकांची मागणीही त्यांनी विधान परिषदेत मांडली.

या चौपदरीकरण प्रकल्पाचे यशस्वी अंमलबजावणी झाल्यास पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, अपघातांचा धोका कमी होईल, आणि शहराच्या पूर्व भागातील अनेक नागरी समस्यांवर सकारात्मक परिणाम होईल. टिळेकरांच्या मागण्या शहराच्या दीर्घकालीन विकासदृष्टीकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune