• Tue. Jul 22nd, 2025

NewsDotz

मराठी

राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; वकिलांचे थेट पोलिस महासंचालकांना पत्र

Jul 15, 2025
राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीराज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

राज ठाकरे यांच्यावर भडका उडणाऱ्या भाषणाचा आरोप; तीन वकिलांनी NSA अंतर्गत कारवाईसाठी पोलिस महासंचालकांना पत्र दिले.

सायली मेमाणे

मुंबई १५ जुलै २०२५ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात भडका उडणाऱ्या भाषण केल्याच्या आरोपावरून आता कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात तीन वरिष्ठ वकिलांनी थेट महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठवून राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या पत्रावर अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड. पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी संयुक्तपणे ही तक्रार सादर केली आहे. ५ जुलै २०२५ रोजी मुंबईच्या वरळी डोम येथे पार पडलेल्या एका जाहीर सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात आक्रमक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात “परप्रांतीयांबरोबर कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास त्याचा व्हिडिओ काढू नका” अशा प्रकारचे निर्देश दिले होते. वकिलांच्या म्हणण्यानुसार, ही सूचना घटनात्मक अपराधांना लपवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दर्शवते. त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांतर्गत राज ठाकरेंवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सदर तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी इतर राज्यांतून आलेल्या नागरिकांना फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सार्वजनिक ठिकाणी मारहाण करणे, त्यांचा अपमान करणे, तसेच जबरदस्तीने मराठी बोलण्यास भाग पाडणे, असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक तणाव आणि भाषिक वैमनस्य वाढीस लागले आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे भाषण अधिकच भडकाऊ आणि भेदभाव निर्माण करणारे असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशाच्या एकात्मतेस आणि राष्ट्रीय सुरक्षेस धोका पोहोचू शकतो, असा दावा करत वकिलांनी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांच्या समर्थकांनी या तक्रारीला राजकीय हेतुपुरस्सर ठरवले असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु पोलीस विभागाकडून याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरील चर्चेने पुन्हा एकदा पेट घेतला आहे. राजकीय वातावरणात भाषिक अस्मितेचा मुद्दा अधिकच गहिरा होत असल्याचे दिसत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune