पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात लावलेले कापडी कापडी वेंडिंग मशीन उद्घाटनानंतर काहीच दिवसांत बिघडले. पर्यावरणपूरक उपक्रमाची दुर्दशा, नागरिकांचा हिरमोड, आणि प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर.
सायली मेमाणे
पुणे २३ जुलै २०२५ : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात काही दिवसांपूर्वी पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून ‘कापडी पिशवी वेंडिंग मशीन’ बसवण्यात आले होते. ‘प्लास्टिकला पर्याय’ या संकल्पनेखाली मोठ्या थाटात झालेल्या या यंत्राचे उद्घाटन महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांनी यावेळी “गणपतीपासून जे काही सुरू होतं, ते निर्विघ्न पार पडतं,” असे म्हणत सकारात्मक शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात हे यंत्र दुसऱ्याच दिवशी बिघडले आणि नागरिकांसाठी ते त्रासाचे कारण ठरले.
यंत्राचे कामकाज सुरू झाल्यावर काही तासातच त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतरही काही वेळा दुरुस्ती झाली, पण त्यानंतर यंत्र पुन्हा बंदच राहिले. यामुळे नागरिकांनी पैसे टाकून पिशवी मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रिकाम्या हातांनी परत जावे लागले. मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर पिशवी न मिळाल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे. त्यातच यंत्रावर बिघाडाची कोणतीही सूचना नसल्याने अनेकांचे पैसे वाया जात आहेत. किती पिशव्या विकल्या गेल्या, किती तक्रारी आल्या आणि किती नुकसान झाले याची कोणतीही नोंद उपलब्ध नाही.
या यंत्राच्या व्यवस्थापनाबाबत प्रशासन आणि मंदिर ट्रस्टमध्ये जबाबदारी ढकलण्याचे प्रकार सुरू आहेत. प्रशासन म्हणते हे आमच्या अखत्यारित नाही, तर मंदिर ट्रस्ट सांगतो की त्यांनी केवळ जागा उपलब्ध करून दिली आहे आणि बिघाड झाल्यास कळविण्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र यंत्र बंद असून कोणतीही ठोस उपाययोजना किंवा दुरुस्तीचा निर्णय अद्याप झालेला नाही.
फूलविक्रेते आणि स्थानिक व्यावसायिक सांगतात की, यंत्र बसवले गेले तेव्हा भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र वारंवार बिघाड झाल्यामुळे आणि पैसे वाया जात असल्याने आता नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. काहीजण तर सरळ विचारणा करत आहेत की, हे यंत्र केव्हा सुरू होणार? की कायम बंदच राहणार?
प्लास्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी असे उपक्रम प्रभावी ठरू शकतात. मात्र नियोजनाचा अभाव, तांत्रिक अडचणी आणि देखभाल न केल्यामुळे हे यंत्र नागरिकांसाठी उपयोगी न ठरता त्रासदायक बनले आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रतिमा अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे मलीन होत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि संबंधित संस्थांनी यंत्राच्या दुरुस्तीवर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
जर ‘प्लास्टिकला पर्याय’ हे खरोखरच उद्दिष्ट असेल, तर त्या दिशेने चालना देणारी साधने देखभालपूर्वक चालवणे हे प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा अशी उपक्रमं केवळ उद्घाटनापुरती मर्यादित राहतील आणि नागरिकांचा विश्वास गमावतील.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter