बिहारमधील लहान मुलाने विषारी सापाला चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाला. मुलाला सौम्य विषबाधा झाली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. ही धक्कादायक घटना जाणून घ्या.
सायली मेमाणे
पुणे २६ जुलै २०२५ : लहान मुलाने सापाला चावा घेतल्याने सापाचा मृत्यू – बिहारमधील चमत्कारिक घटना
बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मोहझी बंकटवा गावात घडलेली एक अनोखी आणि धक्कादायक घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. एका वर्षाच्या लहान मुलाने विषारी नागाला चावा घेतल्यामुळे सापाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
हा चकित करणारा प्रकार बुधवारी घडला. गोविंद कुमार नावाचा एक वर्षीय मुलगा घराजवळ खेळत असताना त्याच्या समोर एक विषारी साप आला. खेळण्याच्या भ्रमात गोविंदने त्या सापाला दातांनी चावा घेतला. काही वेळातच साप मरण पावला, तर गोविंद बेशुद्ध झाला.
कुटुंबीयांनी वेळीच जागरूकता दाखवत त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी बेतिया वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ. सौरभ कुमार यांनी सांगितले की, सापाच्या डोक्याला किंवा मुखभागाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा. गोविंदला सौम्य विषबाधा झाली होती, पण वेळीच उपचार मिळाल्यामुळे तो सध्या सुरक्षित आहे.
या घटनेमुळे गावात आणि सोशल मीडियावर आश्चर्याचा विषय निर्माण झाला आहे. अनेकांनी या मुलाला “नशीबवान” म्हणून गौरवलं आहे. गोविंदच्या आजी मातेश्वरी देवी यांनी सांगितले की, ही घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक क्षणांपैकी एक होती.
दरम्यान, बिहारमधीलच बगाहा भागातील लक्ष्मीपूर गावात एका घरात तीन दिवसांत ६० पेक्षा जास्त साप सापडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter