PMRDA ला ‘१०० दिवस सुधारणा’ उपक्रमात तिसरा क्रमांक; डॉ. म्हसे यांचा मंत्रालयात सत्कार.
मुंबई | २० मे २०२५ :
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ‘१०० दिवस कार्यालयीन सुधारणा’ उपक्रमात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) राज्यभरातील ९५ शासकीय संस्थांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तिसरे स्थान मिळवले. या कामगिरीबद्दल मुंबईतील मंत्रालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा सत्कार करण्यात आला.
या उपक्रमाचे अंतिम मूल्यमापन ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ (QCI) यांनी केले असून, पीएमआरडीएने ७६.०२ गुण मिळवत राज्यभरातून तिसरा क्रमांक पटकावला. हा निकाल १६ मे रोजी जाहीर झाला. कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव सुजाता सैनिक, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. म्हसे यांच्या नेतृत्वात पीएमआरडीएने लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक प्रक्रिया, तांत्रिक नवकल्पना, कार्यालयीन स्वच्छता आणि अद्ययावत सुविधांवर विशेष भर दिला. कार्यालयीन प्रक्रिया गतिमान व पारदर्शक बनवण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. नागरिकांना सहज सेवा मिळाव्यात यासाठी संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले असून, कार्यालयात स्वच्छता व सुविधा यांना प्राथमिकता देण्यात आली आहे.
या सुधारणा केवळ प्रशासनापुरत्याच न राहता, नागरिकांना थेट लाभदायक ठरल्या असल्याने पीएमआरडीएच्या कामकाजाचा राज्य शासनाने गौरव केला आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासनात स्पर्धात्मकता वाढली असून, सर्व विभाग आपल्या कामात नावीन्यता आणण्याकडे लक्ष देत आहेत.
डॉ. म्हसे यांची प्रतिक्रिया :
“या यशामागे माझ्या सर्व टीमचा सामूहिक प्रयत्न आहे. नागरीक-केंद्रित आणि कार्यक्षम प्रशासन आमचे मुख्य ध्येय असून, राज्य शासनाने या कामाची दखल घेतल्याबद्दल आम्ही आभारी आहोत,” अशी प्रतिक्रिया डॉ. म्हसे यांनी दिली.