• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

दक्षिण पुण्यासाठी १२५ एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प

May 22, 2025
दक्षिण पुण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पदक्षिण पुण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

दक्षिण पुणे परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी वडगाव येथे १२५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू, १८८ कोटींचा खर्च अपेक्षित.
सायली मेमाणे,

२२ मे २०२४ : पुणे शहराच्या दक्षिण भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने वडगाव परिसरात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची क्षमता १२५ मेगालिटर प्रतिदिन असून त्यासाठी अंदाजे १८८ कोटी ४७ लाख रुपये खर्च होणार आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण पुणे आणि त्याचबरोबर आसपासच्या समाविष्ट गावांना शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.

सध्या वडगावमध्ये २५० मेगालिटर क्षमतेचे दोन जलशुद्धीकरण केंद्रे कार्यरत असून त्यावरून अनेक भागांचा पाणीपुरवठा चालतो. मात्र, पाणी चोरी आणि पुरेशा नियंत्रणाच्या अभावामुळे या केंद्रांच्या क्षमतेपेक्षा कमी लोकांना पाणी मिळत आहे. त्यामुळे परिसरात पाणी कपातीच्या समस्या उद्भवल्या आहेत.

महापालिकेने या नव्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निधीच्या मदतीने हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकार ३३ टक्के तर राज्य सरकार १७ टक्के निधी देणार असून उरलेला निधी महापालिका उभारणार आहे. या प्रकल्पामुळे वडगाव, आंबेगाव, उंड्री, पिसोळी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, नन्हे यांसारख्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल.

याशिवाय, पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र जुनं असून त्याच्या कार्यक्षमतेत कमी येत आहे. त्यामुळे त्यावरील ताण कमी करण्यासाठी काही भाग वडगावच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाकडे वळवण्यात येणार आहे. तसेच काही भाग वारजे जलकेंद्राकडेही हस्तांतरित केला जाणार आहे. वडगाव येथील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी अंदाजे १८ ते २० महिन्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे.

हा प्रकल्प दक्षिण पुण्याच्या पाणीपुरवठ्यात मोठा बदल घडवून आणेल, असे वाटते. नागरिकांना दर्जेदार आणि सातत्यपूर्ण पाणी मिळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.