• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

नवल किशोर राम पुण्याचे नवे पालिका आयुक्त, पंतप्रधान कार्यालयातून थेट पुण्यात नियुक्ती

May 22, 2025
नवल किशोर राम पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्तनवल किशोर राम पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्त

पुणे महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नवल किशोर राम यांची नियुक्ती. पंतप्रधान कार्यालयातून पुन्हा महाराष्ट्रात, ३१ मे रोजी पदभार स्वीकारणार.
सायली मेमाणे,

पुणे २२ मे २०२४ :पुणे महापालिकेचे सध्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कोण येणार यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत होती. अखेर बुधवारी राज्य सरकारने या चर्चांना पूर्णविराम देत नवल किशोर राम यांची पुण्याचे नवे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती जाहीर केली. ते ३१ मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत.

नवल किशोर राम हे २००८ बॅचचे आयएएस अधिकारी असून, मूळचे बिहार राज्यातील आहेत. त्यांनी पुणे जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषद सीईओ, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर कार्य केले आहे. पुण्यातील त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यकाळात त्यांनी विशेषतः कोविड-१९ काळात केलेल्या प्रभावी अंमलबजावणीमुळे त्यांचे नाव विशेष चर्चेत आले. त्यांनी लॉकडाउनच्या काळात आरोग्य सुविधा वाढवणे, जम्बो कोविड सेंटर उभारणे, ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आणि गरजूंना अन्नधान्य उपलब्ध करून देणे यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना केल्या.

पुण्यातील जिल्हाधिकारी पदानंतर त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांची प्रतिनियुक्ती ऑगस्ट २०२५ पर्यंत होती, मात्र त्यांनी अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या सेवेत पुनरागमन केले आहे. पुण्याच्या महापालिकेत नव्या आयुक्तांच्या नियुक्तीसाठी अनेक आयएएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती, काही जणांनी प्रत्यक्ष फिल्डिंगही लावल्याची माहिती आहे. मात्र, राज्य शासनाने नवल किशोर राम यांची निवड करत स्पष्ट संकेत दिले की पुण्याचा कारभार अनुभवी अधिकाऱ्याच्या हातात दिला जाणार आहे.

नवल किशोर राम यांच्या नियुक्तीमुळे पुणे महापालिकेच्या प्रशासनात नव्या दमाची आणि अनुभवसंपन्न नेतृत्वाची भर पडणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकास आराखड्यात व धोरणात्मक निर्णयांमध्ये निश्चितच दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.