• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे महापालिकेच्या झाडकाम निविदेला स्थगिती, ३५ कोटींच्या नुकसानाचा आरोप

May 22, 2025
पुणे महापालिकेच्या झाडकाम निविदेवर स्थगिती आदेशपुणे महापालिकेच्या झाडकाम निविदेवर स्थगिती आदेश

पुणे महापालिकेच्या झाडकाम निविदेत अपारदर्शक अटींचा आरोप. ३५ कोटींच्या नुकसानाची शक्यता, चौकशीचे आदेश, निविदा तात्पुरती स्थगित.
सायली मेमाणे,

२२ मे २०२४ :पुणे महापालिकेने शहरातील १४ क्षेत्रीय कार्यालयांसाठी झाडकामासाठी एकाच वेळी निविदा काढल्या होत्या. मात्र यामध्ये पूर्णपणे नव्या अटी टाकण्यात आल्यामुळे अनेक पात्र ठेकेदार अपात्र ठरतील, अशी स्थिती निर्माण झाली होती. पूर्वी या कामांसाठी मानवी मनुष्यबळ पुरवणाऱ्या निविदा निघत होत्या, मात्र या वेळी क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रफळाच्या आधारावर निविदेची रक्कम निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे, एका कामगाराकडून किती क्षेत्र झाडून घ्यायचे, यासंबंधीची महत्त्वाची अट यावेळी वगळण्यात आली. याशिवाय, निविदा भरतेवेळी संबंधित कंपनीकडे ‘चॅम्पियन मशीन’ आधीच खरेदी केलेली असणे बंधनकारक असल्याची अट घालण्यात आली होती.

या निविदा प्रक्रियेविरोधात शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महापालिका आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी या निविदेत संगनमत झाल्याचा आरोप करत, जवळपास ३४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर ते न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महापालिकेने झाडकामासाठी दर प्रति चौरस मीटर ५९.४० पैसे असा निश्चित केला होता. मात्र, आलेल्या निविदा या दराच्या तुलनेत ९ टक्क्यांपर्यंत अधिक दराने आल्या. परिणामी, महापालिकेचे किमान ३५ कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या तक्रारींची दखल घेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. त्यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले की, तक्रारींच्या अनुषंगाने काही तथ्य स्पष्ट होत असून संपूर्ण तपासणीनंतर अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल. त्यासाठी तीन ते चार दिवस लागतील. तोपर्यंत या निविदा प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.