• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

कल्याण श्री सप्तश्रृंगी इमारत दुर्घटना : विनापरवानगी दुरुस्तीमुळे सहा मृत्यू, सदस्यावर मनुष्यवधाचा गुन्हा

May 22, 2025
कल्याण श्री सप्तश्रृंगी इमारत दुर्घटनाकल्याण श्री सप्तश्रृंगी इमारत दुर्घटना

कल्याण श्री सप्तश्रृंगी इमारत दुर्घटना :विनापरवानगी दुरुस्ती करताना स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू. कृष्णा चौरासिया यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.
सायली मेमाणे,

पुणे २२ मे २०२४ : कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा भागात असलेल्या श्री सप्तश्रृंगी इमारतीमध्ये विनापरवानगी दुरुस्ती दरम्यान घडलेल्या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेसाठी जबाबदार ठरवून इमारतीमधील रहिवासी कृष्णा लालचंद चौरासिया यांच्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई महाराष्ट्र प्रांतिक व नगररचना प्रादेशिक अधिनियम कलम ४४ आणि एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम २(२) अंतर्गत करण्यात आली आहे.

दुर्घटनेदरम्यान कृष्णा चौरासिया यांनी घरामध्ये टाईल्स बसविण्याच्या उद्देशाने कामगारांच्या मदतीने तोडफोडीचं काम सुरू केलं होतं. यासाठी ना महापालिकेची परवानगी घेण्यात आली, ना सोसायटीची मंजुरी. दुरुस्तीच्या वेळी अचानक जोरदार आवाजासह स्लॅब कोसळली आणि चौथ्या मजल्यावरून खाली थेट तळमजल्यावर पडली. यामध्ये तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावर राहणारे सहा रहिवासी मरण पावले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही इमारत सुमारे वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती आणि गेल्या वर्षीच ती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच पालिकेने इमारत रिकामी करण्याची नोटीसही बजावली होती. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस पालिकेकडून अशा इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा पाठवल्या जातात.

या दुर्घटनेनंतर पालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कृष्णा चौरासिया यांना अटक केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनास्थळी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली आणि मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जाईल असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सध्या श्री सप्तश्रृंगी इमारतीतील उर्वरित ५२ रहिवाशांसाठी नूतन विद्यामंदिर शाळेत तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेकडून त्यांची योग्य व्यवस्था केली जात आहे. या दुर्घटनेमुळे कल्याणमध्ये धोकादायक इमारतींबाबत अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कल्याण श्री सप्तश्रृंगी इमारत दुर्घटना ही एक इशारा असून, नागरिकांनी आणि प्रशासनाने भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी.