पुण्यात मोठी कारवाई: ६,९०० गुंगीकारक गोळ्यांसह दोन जण अटक; खडक पोलिसांची धडक कारवाई

पुण्यात मोठी कारवाई: ६,९०० गुंगीकारक गोळ्यांसह दोन जण अटक; खडक पोलिसांची धडक कारवाई
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन जणांना खडक पोलिसांची अटक. ६,९०० गोळ्या, दुचाकी आणि एकूण १.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त.
०२ डिसेंबर २०२५ : पुणे शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांच्या अवैध विक्रीवर खडक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वारगेटमधील जेधे चौक परिसरात छापा टाकून दोन जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ६,९०० गुंगीकारक गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास पार पडली.
पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर, पोउपनि महेंद्र कांबळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहिम राबवली. स्वारगेट परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांना थांबवून तपासणी करण्यात आली. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत आणि नंतर कोंढवा येथील त्यांच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणावर NITRAZEPAM TABLET I.P (NITZASCEN-10, NITRAFAST-10) आणि Alprazolam Tablet I.P 0.5 mg (ALPRASCEN-0.5) या गुंगीकारक गोळ्या आढळल्या.
एकूण ६,९०० गोळ्या आणि दुचाकीसह एकूण १,४७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये समीर हमीद शेख (वय ४०, रा. कोंढवा) आणि सुनिल गजानन शर्मा (वय ३४, रा. कोंढवा) यांचा समावेश आहे. हे दोघेही गुंगीकारक औषधी गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
खडक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९२/२५ नुसार एनडीपीएस अॅक्ट १९८५ कलम ८ (सी), २२ (सी), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिस कोठडीत आहेत. तपासात पुढे हेही निष्पन्न झाले आहे की आरोपी कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प आणि येरवडा परिसरात नशेसाठी या गोळ्या विक्री करत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून साठा मागवत होते. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त कृषिकेश रावले आणि सहा पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, अर्जुन कुदळे, कुलदीप व्हटकर यांसह हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, विकास पांडोळे आणि इतर अनेक जवानांचा समावेश होता.
पुण्यात वाढत्या नशेबाजांची संख्या आणि औषधी गोळ्यांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शहरात अशा प्रकारच्या विक्रीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare