बीड जिल्ह्यात 843 ऊसतोड महिलांचे गर्भाशय काढल्याची धक्कादायक घटना समोर; महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम
सायली मेमाणे,
प्रतिनिधी न्यूज डॉट्स.
पुणे ३जून २०२५ : बीड जिल्ह्यातून समोर आलेली ही बातमी केवळ धक्कादायक नाही, तर मानवी हक्कांची पायमल्ली दर्शवणारी आहे. ऊसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या सुमारे 843 महिलांचे गर्भाशय केवळ कामाच्या अडचणी टाळण्यासाठी व कमी वयात काढण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा मोठा समावेश आहे.
या महिलांनी ऊसतोड करताना मासिक पाळीमुळे कामात अडथळा होतो म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा कधीकधी सामाजिक दबावामुळे गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला. परंतु यानंतर त्यांना वारंवार जंतुसंसर्ग, कमजोरी, पचनतंत्र बिघडणे, पाठदुखी, मानसिक तणाव आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या भोगाव्या लागत आहेत.
बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा एक प्रमुख केंद्र आहे. येथे दरवर्षी हजारो महिला इतर जिल्ह्यांत ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात. या स्थलांतराच्या काळात त्यांना मूलभूत आरोग्य सेवा, सॅनिटरी सुविधा आणि वैद्यकीय सल्ला मिळत नाही. परिणामी, काही ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचा संशय आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्याकडे पर्याय नव्हते. मासिक पाळीमुळे पगारात कपात होतो, शिवाय विश्रांती घेता येत नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी गर्भाशय काढण्याची चुकीची पद्धत ‘नियमित’ झाली आहे.
या घटनेवर सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हे केवळ आरोग्य धोरणाचे अपयश नाही, तर महिलांवर अन्याय करणारी एक पद्धत आहे,” असे मत महिला आयोगाच्या एका सदस्या व्यक्त केले.
आता मागणी होत आहे की, या महिलांना सरकारी आरोग्य विमा, नुकसानभरपाई, आणि मानसिक आरोग्य सल्ला सुविधा देण्यात याव्यात. याशिवाय संबंधित रुग्णालयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ऊसतोड मजूर संघटनांनी केली आहे.