महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धारावी पुनर्विकासासाठी कुर्ला येथील 8.05 हेक्टर मदर डेअरी भूखंड हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सायली मेमाणे
प्रतिनिधी न्यूज डॉट्स.
पुणे ३जून २०२५ : मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ल्यातील सुमारे 8.05 हेक्टर जमीन अधिकृतरित्या हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित भूखंड पूर्वी दुग्ध व्यवसाय विभागाच्या ताब्यात होता, मात्र आता हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.
धारावी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनेक कुटुंबांचे पुनर्वसन आवश्यक असून या जमिनीचा वापर त्या दृष्टीने केला जाणार आहे. मागील काही महिन्यांपासून या जागेच्या हस्तांतरावर राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा सुरू होती. काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता, परंतु सरकारने प्रकल्पाच्या गरजेनुसार हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
धारावीमधील पुनर्वसन योजनांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून सरकारने विविध पर्यायांचा अभ्यास केला होता. याच प्रक्रियेत कुर्ला परिसरातील ही जागा निवडण्यात आली. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या गतीला चालना मिळेल आणि रहिवाशांचे स्थलांतर अधिक सुसज्जपणे करता येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांमध्ये अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, काही ठिकाणी सरकारी रुग्णालयासाठी जमीन वाटप, आणि महामंडळांना टोल भरपाईसाठी मंजुरी यांचा समावेश आहे. धारावीतील पुनर्विकास हे मुंबईच्या शहरी विकासाचे मोठे पाऊल असून सरकार त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध आहे, असेही सांगण्यात आले.