• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

वाघोली इंजिनियरींग पेपर घोटाळा: प्राध्यापकासह १२ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Jun 3, 2025
वाघोली इंजिनियरींग पेपर घोटाळा वाघोली इंजिनियरींग पेपर घोटाळा

वाघोली इंजिनियरींग पेपर घोटाळ्यात प्राध्यापकासह १२ जणांवर गुन्हा दाखल; विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन उत्तरपत्रिका परत लिहून घेण्याचा आरोप.

सायली मेमाणे
प्रतिनिधी न्यूज डॉट्स.

पुणे ३जून २०२५ : वाघोली इंजिनियरींग पेपर घोटाळा ही घटना पुणे शहरातील शिक्षण क्षेत्रात मोठा धक्का देणारी आहे. पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग येथे हा प्रकार घडला असून, प्राध्यापकासह एकूण १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी ही माहिती उघड केली असून, यात पेपर झाल्यानंतर तो परत विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यासाठी पैसे घेण्यात आले होते.

गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी बायफ रोडवरील कॉलेजवर छापा टाकला. पोलिसांनी प्राध्यापक प्रतिक किसन सातव, वय ३७, राहणार केसनंद, वाघोली, याला त्याच्या तीन साथीदारांसह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आदित्य यशवंत खिलारे (२०), अमोल आशोक नागरगोजे (१९) आणि अनिकेत शिवाजी रोडे (२०) यांचाही समावेश आहे. त्यांच्या सोबतच आठ विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

सदर आरोपींनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करून, त्यांच्याकडून १० ते ५० हजार रुपये घेतले. यानंतर दुपारी झालेला इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ पेपर रात्री पुन्हा लिहून घेण्यात आला. हे करण्यासाठी कॉलेजमधील परीक्षा कंट्रोल रूमची बनावट चावी बनवून सहा सिलबंद उत्तरपत्रिका बंडल बाहेर काढण्यात आले. हे सर्व उत्तरपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी देण्यात आल्या आणि त्यानंतर त्या पुन्हा परिक्षा यंत्रणेत जमा केल्या गेल्या.

पोलिसांनी २ लाख ६ हजार रुपये रोख, सहा बंडल उत्तरपत्रिका व कंट्रोल रूमची बनावट चावी असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस तपासात हे स्पष्ट झाले की ही टोळी नेहमी अशा पद्धतीने पैसे घेऊन पेपर परत लिहवून घेत होती आणि शिक्षण व्यवस्थेचा गैरफायदा घेत होती.

शिक्षण क्षेत्रातील ही घटना अत्यंत धक्कादायक असून, परीक्षेच्या प्रक्रियेवरील विश्वासाला मोठा तडा गेला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे शिक्षण व्यवस्था, विद्यापीठांची छबी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकले जात आहे. पोलिसांनी सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध फसवणूक, शासकीय कागदपत्रे हस्तगत करणे, बनावट चावी तयार करणे यासारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात पुढील चौकशी सुरू असून इतर कोणतीही शिक्षण संस्था किंवा कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. समाजातून या प्रकरणाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अनेकांनी अशा प्रकरणात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडू नये म्हणून शासनाने आता कडक उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता राखण्यासाठी परीक्षा व्यवस्थापनावर अधिक विश्वासार्ह आणि आधुनिक तंत्रज्ञान आधारित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये उत्तरपत्रिकांचे इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग, बायोमेट्रिक प्रवेश, आणि परीक्षा केंद्रांचे सतत निरीक्षण यांचा समावेश होऊ शकतो.