कोल्हापुरात सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीवर 10 लाखांच्या हुंड्यासाठी पतीकडून मानसिक, शारीरिक छळ. तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे ६ जून २०२५ : कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुण विवाहितेवर पतीकडून सात महिन्यांच्या गर्भावस्थेत असताना हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. या प्रकरणी संबंधित पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिलांवरील छळ आणि हुंड्याच्या वाढत्या प्रकरणांवर नव्याने लक्ष वेधलं जात आहे.
या प्रकरणातील पीडित महिला नर्सिंग शिक्षण घेत असताना तिची ओळख एका तरुणाशी झाली आणि त्यातून २०२४ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर काही महिन्यांमध्ये ती गर्भवती राहिली. मात्र, या गर्भधारणेनंतरच पतीचे वागणूक बदलले. ती घरकामात कमी पडते, वेळेवर उठत नाही, अशा किरकोळ कारणांवरून तिच्यावर सतत तणाव टाकला जात होता.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे, पतीने तिला स्पष्ट शब्दांत १० लाख रुपयांची मागणी केली. “तुझ्या आईवडिलांनी काही दिलं नाही, त्यामुळे तू मला पैसे घेऊन ये” असा जाब तो तिला देत होता. या मागणीला बळ देण्यासाठी त्याने तिला गर्भपाताचा प्रस्तावही दिला. “हे बाळ नको, गर्भपात करून घे आणि घटस्फोट घे”, अशी धमकी तो वारंवार देत होता.
पीडित महिलेने मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे काही दिवस माहेरी आश्रय घेतला. तिथूनही पतीने तिला संपर्क करण्यास नकार दिला. नंतर नातेवाईकांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा मारहाण आणि धमक्या सुरु झाल्या.
या संपूर्ण प्रकारामुळे पीडित महिलेने अखेर पोलिसात तक्रार दाखल केली. करवीर पोलिसांनी सदर पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील चौकशी सुरु केली आहे. सध्या पीडित महिला तिच्या कुटुंबासोबत सुरक्षित आहे.
या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. विशेषतः गर्भवती अवस्थेत अशा प्रकारचा छळ हा गंभीर गुन्हा मानला जातो. सामाजिक संस्था आणि महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येत आहे.