राजगडावरून उतरताना पुण्यातील २० वर्षीय पर्यटक महिलेचा पाय घसरल्याने मृत्यू. वेल्हे पोलिसांची मदतकारवाई आणि आपत्ती व्यवस्थापनाची तत्काळ हालचाल.
सायली मेमाणे
पुणे ६ जून २०२५ : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या एका २० वर्षीय विवाहित महिलेचा पाय घसरून खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव कोमल सतीश शिंदे असे असून, त्या पतीसोबत राजगडावर सहलीसाठी गेल्या होत्या. ही दुर्घटना ५ जून रोजी सायंकाळी अंदाजे साडेपाचच्या सुमारास घडली.
राजगड पाहून परतीच्या वाटेवर असताना कोमल यांचा तोल गेला आणि त्या जवळपास दीडशे फूट खोल दरीत कोसळल्या. याबाबत माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनमधील अधिकारी युवराज सोमवंशी, तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, निलेश जाधव, संदीप सोळसकर आणि सनी माने यांनी तात्काळ गडावर मदतीसाठी धाव घेतली.
दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे गडाची चढउतार खूप निसरडी झाली होती. यामुळेच कोमल यांचा पाय घसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघात घडल्यावर रात्री उशिरा सुमारे साडेअकरा वाजेपर्यंत मृतदेह स्ट्रेचरच्या साह्याने गडावरून खाली आणण्यात आला.
कोमल यांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, डॉ. शिवाजी कुरणकर यांनी तपासणीदरम्यान त्यांचा मृत्यू आधीच झाल्याचे स्पष्ट केले. या हृदयद्रावक घटनेमुळे पर्यटकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.