रॅपर एमीवे बंटाई यांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देऊन १ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आसाममधून १८ वर्षीय तरुणाला अटक केली असून दुसरा मास्टरमाईंड असल्याचा संशय आहे.
सायली मेमाणे
पुणे ६ जून २०२५ : प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई उर्फ मुहम्मद बिलाल शेख यांना अलीकडेच धमकीचा फोन आल्याने गाजलेले प्रकरण आता गूढ वळणावर आहे. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १८ वर्षीय तरुणाला आसाममधून अटक केली आहे. आरोपीचे नाव अरुलव रमेश कुमार अलोही असे असून, तो वाणिज्य शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एमीवे बंटाई यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी आसाममध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे ही कारवाई केली. विशेष बाब म्हणजे आरोपीने स्वतःला कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारशी संबंधित असल्याचा बनाव करून हे कृत्य केले होते.
घटनेला आणखी वळण मिळाले तेव्हा पोलिसांनी उघड केले की धमकी देण्यामागे आरोपीच्या मोबाईलवरून अनेक महत्त्वाचे संदेश डिलीट करण्यात आले होते. प्राथमिक चौकशीतून असेही समोर आले आहे की या गुन्ह्यामागे कोणीतरी इतर व्यक्ती आरोपीला सोशल मीडियाद्वारे प्रवृत्त करत होते. त्यामुळे पोलिसांनी संभाव्य मास्टर माईंडच्या शोधासाठी तपासाचा फोकस बदलला आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर असेही लक्षात घेण्यासारखे आहे की रॅपर एमीवे बंटाई यांनी दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या पुण्यतिथीनिमित्त ‘ट्रिब्युट टू सिद्धू मूसेवाला’ हे गाणे प्रसिद्ध केले होते. हाच ट्रिगर पॉइंट ठरल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे, कारण गाणे प्रसिद्ध झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी ही धमकी देण्यात आली होती.
सध्या आरोपीकडून अधिक चौकशी केली जात असून, या प्रकरणाचा संपूर्ण कट कारस्थान कोणत्या नेटवर्कच्या माध्यमातून घडवून आणला गेला, याचा तपास नवी मुंबई पोलिस करत आहेत.