• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

माणगाव एमआयडीसी विभागीय कार्यालय सुरू होणार; दिघी बंदर विकासाला चालना

Jun 7, 2025
माणगाव एमआयडीसी विभागीय कार्यालय सुरू होणारमाणगाव एमआयडीसी विभागीय कार्यालय सुरू होणार

माणगाव येथे एमआयडीसीचे नवीन विभागीय कार्यालय सुरू होणार असून दिघी बंदर आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार आहे.

सायली मेमाणे

पुणे ७ जून २०२५ : माणगाव एमआयडीसी विभागीय कार्यालय सुरू होणार असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कार्यालयाच्या स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. ही कारवाई दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रकल्पाअंतर्गत सुरू असून सुमारे ६,४६२ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. या पैकी ४,०११ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसीमार्फत औद्योगिक विकास केला जाणार आहे.

माणगाव येथे हे विभागीय कार्यालय स्थापण्यात येणार असून त्याचा मुख्य उद्देश दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करणे हा आहे. यामध्ये दोन मुख्य प्रकल्पांचा समावेश आहे – ६१.९७ हेक्टरवर पादत्राणे व चर्मोद्योग क्लस्टर प्रकल्प आणि १,००० हेक्टरवर बल्क ड्रग पार्क. उर्वरित २,४६० हेक्टर क्षेत्रावर केंद्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार आहे.

एमआयडीसीने विळेभागाड (माणगाव) येथे स्थापत्य विभागाचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील ८ ते १० वर्षांत सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे औद्योगिक गुंतवणूकदारांना आवश्यक सर्व सोयीसुविधा येथे मिळणार असून रोजगारनिर्मितीलाही मोठा हातभार लागेल.

यापूर्वी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विकासासाठी असेच पावले उचलण्यात आले होते. त्याच धर्तीवर दिघी बंदराच्या विकासासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. माणगाव एमआयडीसी विभागीय कार्यालय स्थापन झाल्याने संपूर्ण कोकणपट्ट्यातील औद्योगिक विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.