गुरुवारी पुण्यातील ‘या’ विभागात पाणीपुरवठा बंदपुण्यातील ‘या’ विभागात पाणीपुरवठा बंद १२ जून रोजी काही भागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.
सायली मेमाणे
पुणे : 9 जून २०२५ : पुण्यात १२ जून २०२५ रोजी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. यानुसार, वारजे जलशुद्धीकरण केंद्र आणि भामा आसखेड प्रकल्पांतर्गत विविध तांत्रिक कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर १३ जून रोजी शुक्रवारी काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, नवीन लाईनची जोडणी, व्हॉल्व बसवणे आणि पाण्याच्या वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी ही पाणी कपात करण्यात येणार आहे. बालेवाडी जकात नाका टाकी, सन हॉरिझोन टाकी, बाणेर वेस्ट टाकी, पाषाण लेक टाकी, लोकसेवा सूस-पाषाण-बाणेर लिंक रोड टाकी, पॅनकार्ड क्लब रोड टाकी अशा ठिकाणी कामे केली जाणार आहेत. परिणामी, या भागांतील नागरिकांना एक दिवसभर पाण्याचा अभाव जाणवणार आहे.
या कामांचा परिणाम खालील भागांवर होणार असून, या सर्व भागांमध्ये गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे:
बालेवाडी, बाणेर, पाषाण, बावधन, शास्त्रीनगर, डुक्करखिंड, शांतीबन, सुस रोड, मोहननगर, पंचवटी, म्हाळुंगे, परमहंसनगर, भारतीनगर, सुरजनगर, चिंतामणी सोसायटी, व्यू लक्ष्मीनगर, गुरूगणेशनगर, सारथी शिल्प, पूजा पार्क, निम्हणमळा, लम्हाण तांडा, बाणेर गावठाण, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, विजयनगर, मेडीपॉईंट रोड, आंबेडकर नगर, दत्तनगर, चाकणकर मळा, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, संजय पार्क, लोहगाव, बोराटे वस्ती आणि शेजवळ पार्क.
महानगरपालिकेच्या सुचनेनुसार, नागरिकांनी या कालावधीत पुरेसे पाणी साठवून ठेवावे. शाळा, हॉस्पिटल्स आणि इतर महत्त्वाच्या सेवा सुरू ठेवण्यासाठी याठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात येईल. पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर पहिल्या काही तासांमध्ये पाणी मळकट स्वरूपात येऊ शकते, त्यामुळे वापरण्यापूर्वी फिल्टर किंवा उकळून वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
शहरातील जलवाहिन्यांची देखभाल आणि सुधारणा ही नियमित प्रक्रिया आहे. भविष्यातील जलपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही कामे केली जात आहेत. पाणीपुरवठा बंद योजनेची अंमलबजावणी नियोजित असून नागरिकांच्या गैरसोयीची शक्यता असल्यामुळे योग्य पूर्वसूचना देण्यात आली आहे.
महापालिकेच्या जलविभागाने नमूद केले आहे की, कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल. मात्र, नागरिकांनी काही काळ संयम ठेवून सहकार्य करावे. ही पाणी कपात ही नागरिकांच्या हितासाठी आणि आगामी काळातील सातत्यपूर्ण पाणीपुरवठ्यासाठी उपयुक्त ठरेल.