पुण्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पिस्तूल व काडतुसे जप्त.
सायली मेमाणे
पुणे : 9 जून २०२५ : पुणे शहरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन व्यक्तींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ७ जून रोजी कपिलामृत डेअरीजवळ करण्यात आली. पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभम प्रमोद माने (वय २६, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) आणि गणेश बाबासाहेब लंके (वय २७, रा. महादेवनगर, शेलार मळा, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी आहेत. हे दोघे मोकळ्या मैदानात गोळीबाराचा सराव करणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे कपिलामृत डेअरीजवळ एका मोकळ्या जागेत थांबले होते आणि त्यांच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी वेळीच कारवाई करून शुभम माने आणि गणेश लंके यांना ताब्यात घेतले. तिसरा व्यक्ती मात्र घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांनी दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ही शस्त्रे त्यांनी कोणाकडून घेतली, त्यांचा उद्देश काय होता, आणि ती कुठे वापरणार होते याचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हे दोघेही काही गंभीर गुन्ह्याच्या तयारीत होते.
या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक निरीक्षक समीर शेंडे, तसेच कर्मचारी सौरभ वायदंडे, संग्राम पवार, सागर कोंडे, केतन लोखंडे यांनी सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त स्मार्तना पाटील आणि सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिसांकडून सध्या माने आणि लंके यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा आणखी कोणत्या टोळीशी संबंध आहे का, किंवा त्यांनी हे पिस्तूल कोणाकडून, किती किंमतीला घेतले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे बाळगणं हे गंभीर गुन्ह्यांत मोडत असल्यामुळे ही कारवाई पुणे शहरात मोठ्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालणारी ठरण्याची शक्यता आहे. अशा बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर पोलिसांची कठोर कारवाई सुरू असून, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा टोळ्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.