• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

ICU मध्ये महिलेवर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन देऊन रुग्णालय कर्मचाऱ्याचा अमानुष प्रकार

Jun 9, 2025
ICU मध्ये महिला बलात्कार ICU मध्ये महिला बलात्कार

राजस्थानमधील रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत असलेल्या महिलेवर गुंगीचं इंजेक्शन देऊन बलात्कार; रुग्णालय कर्मचाऱ्यावर आरोप, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सायली मेमाणे

पुणे : 9 जून २०२५ : राजस्थानमधील एका रुग्णालयातून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षांच्या महिलेवर ICU मध्ये उपचार सुरू असताना गुंगीचं इंजेक्शन देऊन बलात्कार करण्यात आल्याचा आरोप एका रुग्णालय कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना ४ जून रोजी घडली असून, पीडित महिला गंभीर आजारामुळे आयसीयूत दाखल होती. तिच्यावर उपचार सुरू असताना, ती अर्धशुद्ध अवस्थेत असतानाच, आरोपीने तिला गुंगी येणारे औषध दिले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही संपूर्ण घटना रुग्णालयाच्या आयसीयु वॉर्डमध्ये घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिच्या बेडभोवती पडदे लावण्यात आले होते आणि तिचे कुटुंब सदस्य वॉर्डच्या बाहेर थांबले होते. औषध दिल्यानंतर तिला झोप लागल्याचा भास झाला आणि तेव्हाच तिच्यावर अत्याचार झाला. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने रडत रडत आपला अनुभव कुटुंबाला सांगितला.

या प्रकरणात एका महिला रुग्णानेही प्रत्यक्षदर्शी म्हणून माहिती दिली असून, तिच्या म्हणण्यानुसार रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने पीडितेसोबत गैरवर्तन केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. पीडित कुटुंबीयांच्या आरोपानुसार रुग्णालय प्रशासनाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला.

अलवर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर सिंग यांनी सांगितले की, “या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला गुंगीचं औषध दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.” पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

पीडित महिलेने पोलिसांसमोर सांगितले की, “तो माझ्याजवळ आला आणि मला इंजेक्शन दिलं. त्यानंतर मला झोप लागल्यासारखं वाटलं. मी अर्धवट शुद्धीत होते. तेव्हाच त्याने माझ्यावर बलात्कार केला.” या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीचा शोध घेतला.

आता पोलिसांनी संबंधित रुग्णालय कर्मचाऱ्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत बलात्कार व अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे रुग्णालयातील सुरक्षेविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयसीयु सारख्या सुरक्षित व अत्यंत मर्यादित प्रवेश असलेल्या विभागात जर अशा घटना घडू शकतात, तर रुग्णांची सुरक्षा ही केवळ प्रश्नचिन्हितच नव्हे तर धोक्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी सखोलपणे केली जात असून, पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणा कार्यरत आहेत. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांनुसार आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे गुन्ह्याची चौकशी जलद गतीने सुरू आहे.