सोमवारपासून मंडई मेट्रो स्थानकाचा नवीन गेट क्रमांक ३ प्रवाशांसाठी खुला; तुळशीबाग, शनिपार परिसरात पोहोचणं होणार आणखी सोपं.
सायली मेमाणे
पुणे : 9 जून २०२५ : पुणेकरांसाठी एक दिलासा देनारी बातमी आहे – शहराच्या मध्यवर्ती मंडई भागात असलेल्या मेट्रो स्थानकाचा नविन गेट क्रमांक ३ आता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवार, ९ जूनपासून ही सुविधा वापरता येणार आहे. या प्रवेशद्वारामुळे तुळशीबाग, दगडूशेठ गणपती, शनिपार चौक आणि बाबूगेनू गणपती मंदिर या प्रसिद्ध ठिकाणी पोहोचणे आता अधिक सोयीचे होणार आहे.
मंडई परिसर हा नेहमीच वर्दळीचा असतो आणि वाहनांची कोंडी ही येथे रोजची बाब. त्यामुळे मेट्रोने या भागात येणे हे नागरिकांसाठी वेळ वाचवणारे आणि त्रास कमी करणारे ठरणार आहे. नविन उघडण्यात आलेला गेट हा टिळक पुतळ्याजवळ असून, महात्मा फुले मंडईजवळच्या बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय, पुणे मेट्रोने आणखी दोन स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी नवी सेवा सुरू केली आहे. रामवाडी आणि कासारवाडी या स्थानकांवर एस्केलेटर (स्वयंचलित जिने) आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहेत. याआधी येथे जिने आणि लिफ्ट उपलब्ध होते, मात्र एस्केलेटरमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांसाठी प्रवास आणखी सुलभ होणार आहे.
एस्केलेटरमुळे चढ-उतार अधिक सहज व थकवारहित होत असल्याने प्रवाशांचा अनुभव निश्चितच सुधारेल. ही सुविधा सुरळीत आणि जलद वाहतूक प्रणालीकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. पुणे मेट्रोच्या या सुधारित सेवांमुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीची गुणवत्ता उंचावते आहे.
पुणेकरांनी या नव्या सेवांचा लाभ घेऊन पर्यावरणपूरक आणि वेळबचतीचा पर्याय म्हणून मेट्रोचा अधिक उपयोग करावा, असे आवाहन नागरिकांमधून होत आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक वाहतुकीतील असे सुधारणात्मक बदल हे गरजेचेच आहेत.