पुण्यात इराणचे झेंडे आणि अली खामेनेई यांचे फ्लेक्स लावल्याने हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक विरोध, परिसरात तणावाचं वातावरण.
सायली मेमाणे
पुणे 30 जून २०२५ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात इराणचे झेंडे आणि तेथील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे फ्लेक्स झळकवल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार रविवारी २९ जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. हवेली तालुक्यातील कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत इराणचे राष्ट्रीय झेंडे व खामेनेई यांचे प्रतिमासहित फ्लेक्स लावले गेले असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी झेंडे आणि फ्लेक्स काढून टाकण्याची मागणी करत परिसरात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या पार्श्वभूमीवर लोणी स्टेशन परिसरात जमाव जमल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून इराणी नागरिकांकडून घोषणाबाजी सुरू असल्याच्या चर्चा होत होत्या. काही स्थानिकांनी सांगितले की, अज्ञात परदेशी नागरिक गटात जमून काही धार्मिक किंवा राजकीय संदर्भातील नारे देत होते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप पोलीस प्रशासनाकडून झालेली नाही.
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांचा घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाची गंभीर दखल घेत असून फ्लेक्स कोणाच्या आदेशाने आणि उद्देशाने लावण्यात आले हे शोधण्याचे काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक तणाव वाढू नये यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फ्लेक्स लावण्यामागे धार्मिक श्रद्धा, परदेशी समुदायाचा सण की राजकीय संदेश, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी परस्पर सलोखा राखावा आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांना केले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter