दिल्लीतील सीलमपूरमध्ये बेकायदेशीर 4 मजली इमारत कोसळली; १२ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू.
सायली मेमाणे
नवी दिल्ली १२ july २०२५ : नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत आज (१२ जुलै) सकाळी भीषण दुर्घटना घडली. उत्तर-पूर्व दिल्लीतल्या सीलमपूर परिसरातील जनता मजदूर कॉलनीमध्ये बांधलेली चार मजली बेकायदेशीर इमारत कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत ३ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, सुमारे १२ जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन एकत्र येऊन अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.
संबंधित इमारत अवघ्या ३०-३५ गज क्षेत्रफळामध्ये बेकायदेशीरपणे बांधण्यात आली होती. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते आणि कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळेच इमारत कोसळण्याचा धोका पूर्वीपासून होता.
घटनास्थळावरील दृश्य अत्यंत हृदयद्रावक असून, अनेक नागरिक आपल्या नातेवाइकांचा आवाज ऐकण्यासाठी ढिगाऱ्याजवळ थांबले आहेत. दिल्ली सरकारने या दुर्घटनेचा तातडीने आढावा घेण्याचे आदेश दिले असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर तसेच बांधकाम क्षेत्रातील अनियमिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अवैध बांधकामे आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात येत असल्याचे या घटनेतून दिसून येते.
बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्च आणि रेस्क्यू उपकरणांचा वापर सुरू केला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत असून, मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter