यवत पोलिसांनी भुलेश्वर मंदिराजवळ सापडलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाचा छडा लावला आहे. अनैतिक संबंधातून २४ वर्षीय तरुणाची हत्या केल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक.
सायली मेमाणे
पुणे १२ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस ठाणे हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी २७ जून २०२५ रोजी सकाळी एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, अनैतिक संबंधातून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर मृतदेह एका अज्ञात व्यक्तीचा असून त्याचे डोके, छाती आणि पाठ यावर धारदार हत्याराने गंभीर वार करण्यात आले होते. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यास पेटवण्यात आले होते. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. ५५३/२०२५ नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, इतर जिल्ह्यांतील मिसिंग रेकॉर्डची तपासणी करून मृत व्यक्तीची ओळख लखन किसनराव सलगर (वय २४, रा. टाकळी ढोकी, ता. लोहारा, जि. धाराशिव) अशी पटवली. त्यानंतर गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना हे स्पष्ट झाले की, आरोपींनी अनैतिक संबंधांमुळे रागाच्या भरात कट रचून ही हत्या केली होती.
पोलिसांनी अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:
- योगेश दादा पडळकर (२५, रा. माळशिरस, ता. पुरंदर, पुणे)
- राजश्री योगेश पडळकर (२३, रा. माळशिरस, ता. पुरंदर, पुणे)
- विकास आश्रुबा कोरडे (२१, रा. आनंदवाडी, टाकळी ढोकी, जि. धाराशिव)
- शुभम उमेश वाघमोडे (२२, रा. मुरुड, जि. लातूर)
- काकासाहेब कालिदास मोटे (४२, रा. येवती, जि. धाराशिव)
या सर्वांनी संगनमत करून धारदार हत्याराने लखन सलगर याच्यावर हल्ला केला. नंतर त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यवत पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी संयुक्त कारवाई करत दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सर्व आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापाव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश माने यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये यवत पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेतील अनेक अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
पोलीस तपास सुरू असून आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि अधिकृत माहितीसाठी पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte