• Mon. Jul 28th, 2025

NewsDotz

मराठी

ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका; महाराष्ट्रात ९०% शोरूम बंद करण्याचे आदेश

Jul 15, 2025
ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका; महाराष्ट्रात ९०% शोरूम बंद करण्याचे आदेशओला इलेक्ट्रिकला मोठा झटका; महाराष्ट्रात ९०% शोरूम बंद करण्याचे आदेश

परवाना उल्लंघनामुळे ओला इलेक्ट्रिकच्या महाराष्ट्रातील ९०% शोरूम बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या निर्णयामुळे ओलाच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सायली मेमाणे

पुणे १५ जुलै २०२५ : महाराष्ट्रात ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका; परवाना उल्लंघन प्रकरणी ९०% शोरूम बंद करण्याचे आदेश

महाराष्ट्र सरकारने ओला इलेक्ट्रिकच्या विक्री धोरणाला मोठा झटका दिला आहे. राज्यात ओला इलेक्ट्रिकच्या जवळपास ९०% शोरूमना (सुमारे ४०५ पैकी ४५०) परवान्यांचे उल्लंघन केल्यामुळे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे कंपनीच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सदर शोरूममध्ये इलेक्ट्रिक वाहने साठवण्यासाठी आवश्यक परवाने नसल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय, अनेक शोरूम योग्य ‘ट्रेड सर्टिफिकेट’शिवायच व्यवसाय करत होते. वाहन विक्रीसाठी हे प्रमाणपत्र बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. या परिस्थितीमुळे कंपनीच्या नियमन व पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

महाराष्ट्र हे ओला इलेक्ट्रिकसाठी सर्वात महत्त्वाचे राज्य मानले जाते. FY25 मध्ये भारतात विकल्या गेलेल्या ३.४४ लाख इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये महाराष्ट्रातूनच ४१,००० युनिट्सची विक्री झाली. संपूर्ण देशात FY25 मध्ये २.१२ लाख इलेक्ट्रिक दुचाकी महाराष्ट्रात विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे अशा महत्त्वाच्या बाजारात शोरूम बंद होणे ही ओलासाठी गंभीर बाब ठरते.

याशिवाय, कंपनीच्या बाजारातील हिस्सा देखील चिंताजनकरीत्या घसरलेला आहे. FY25 च्या पहिल्या तिमाहीत ३३.४% असलेला मार्केट शेअर FY26 च्या पहिल्या तिमाहीत केवळ १९.६% इतकाच राहिला. एप्रिल ते जून दरम्यान ओलाने केवळ ६०,५०० इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या, ज्यामध्ये वर्षभरात मोठी घट झाली आहे. त्याचवेळी टीव्हीएस मोटर आणि बजाज ऑटो यांनी महिन्याच्या विक्रीत ओलाला मागे टाकले आहे.

सुरुवातीच्या वर्षात कंपनीने विक्रीविषयक आकडेवारीत सुद्धा गोंधळ निर्माण केल्याचा आरोप होता. ओलाने एका कालावधीत २५,००० गाड्या विकल्याचा दावा केला होता, पण अधिकृत नोंदणीकडे पाहता केवळ ८,५०० गाड्यांचीच नोंद आढळली होती. यामुळे अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली होती.

आर्थिक बाबतीतही कंपनीवर ताण वाढलेला आहे. FY26 च्या पहिल्या तिमाहीत ओला इलेक्ट्रिकचा एकत्रित निव्वळ तोटा ₹४२८ कोटी इतका होता, जो मागील वर्षी याच तिमाहीत ₹३४७ कोटी होता. महसूल देखील ₹१,६४४ कोटीवरून ₹८२८ कोटीपर्यंत घसरला आहे. जरी कंपनीने Bloomberg च्या ₹७३५ कोटी महसूल व ₹४५२ कोटी तोट्याच्या अंदाजाला मागे टाकले असले, तरी हे आकडे कंपनीसाठी सततच्या दबावाचे संकेत देतात.

ओला इलेक्ट्रिकसाठी ही परिस्थिती सावरणे कठीण होत चालले आहे. परवाना नोंदणीतील विसंगती, आर्थिक ताळेबंदातील घसरण आणि बाजारातील स्पर्धकांकडून होणारी कडवी टक्कर – या सर्व घटकांनी कंपनीच्या भविष्यातील रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune