आंबेगाव पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट-२ यांनी पुण्यातील ४० लाखांच्या जबरी चोरी प्रकरणात अवघ्या २४ तासात आरोपींना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली गाडी, रोख रक्कम आणि मोबाईल हस्तगत.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे १७ जुलै २०२५ : पुणे शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशन आणि युनिट-२ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबरी चोरीच्या गंभीर प्रकरणात अवघ्या २४ तासात आरोपींना अटक करत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. दिनांक १५ जुलै २०२५ रोजी एक व्यवसायीक, जो येडशी, धाराशिव येथून पुण्यातील बिल्डरकडे पत्रा स्टील पुरवठ्यानंतरचे पैसे घेण्यासाठी आले होते, त्याच्याकडे ४० लाख रुपये रोख रक्कम एका बॅगमध्ये होती. हे पैसे घेऊन ते बाबजी पेट्रोलपंप, आंबेगाव परिसरात असलेल्या ऑफिसकडे जात असताना अचानक काळ्या रंगाच्या महिंद्रा थार वाहनातून आलेल्या तिघांनी त्याच्या मित्राकडून पैशाची बॅग हिसकावली आणि पळ काढला.
फिर्यादीने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आंबेगाव पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि वाहन क्रमांकाच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासात एमएच १२ डब्लुई ००८५ क्रमांकाच्या थार गाडीचा शोध घेण्यात आला आणि आरोपींची ओळख पटवण्यात आली. पुढील तपासादरम्यान प्रदीप डोईफोडे, मंगेश ढोणे आणि एका विधीसंघर्षीत बालकाला अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पाच मोबाईल हँडसेट्स, ९ लाखांहून अधिक रोख रक्कम आणि वापरलेली चारचाकी गाडी व नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या.
चकीत करणारी बाब म्हणजे फिर्यादीच्या मित्रानेच आरोपींना माहिती दिली होती आणि संगनमत करून ही जबरी चोरी घडवून आणली. पोलिसांनी त्याचा सहभागही निष्पन्न केला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त श्री. संजय बनसोडे, गुन्हे शाखेचे डीसीपी निखील पिंगळे, परिमंडळ २ चे डीसीपी श्री. मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपास पथकात विजय कुंभार, अंजुम बागवान, शरद झिने, गजानन चोरमले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी काम केले.
गंभीर गुन्हा घडून गेल्यानंतर अवघ्या २४ तासांत आरोपींना पकडणे आणि काही प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे ही पोलीस यंत्रणेची जलद आणि प्रभावी कार्यक्षमता दर्शवते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या अशा वेगवान कारवाया आवश्यक असून, अशा कार्यामुळे गुन्हेगारीला चाप बसण्यास मदत होते. हा गुन्हा सामाजिक विश्वासाला धक्का देणारा असला, तरी पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यात लवकर यश मिळालं आणि पुढील गुन्हे होण्यापासून आळा घालण्यात आला.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter