स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहराने महाराष्ट्रात पहिला आणि देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. ७-स्टार गार्बेज फ्री आणि वॉटर प्लस मानांकन कायम ठेवले. वाचा संपूर्ण अहवाल.
पुणे(पिंपरी चिंचवड १७ जुलै २०२५ : पिंपरी चिंचवड – स्वच्छतेसाठी आपली ओळख निर्माण करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून, देशभरातील दशलक्षहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सातवा क्रमांक मिळवला आहे. यासोबतच शहराने ७-स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लस हे मानांकन देखील कायम ठेवले आहे.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री टोकण साहू उपस्थित होते. या राष्ट्रीय सर्वेक्षणात ४५०० हून अधिक शहरे सहभागी झाली होती, ज्यामध्ये १४ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड शहर देशात १३व्या आणि राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होते. यंदाच्या रँकिंगमध्ये झालेली झपाट्याने झालेली सुधारणा ही घनकचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, स्वच्छता पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचे फलित आहे.
शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये वैज्ञानिक पद्धतीने कचरा प्रक्रिया, घरपोच विभागणीसह संकलन, कंपोस्टिंग युनिट्स, रिसायकल प्लांट आणि बायोगॅस प्रकल्प यामुळे शहराला पुन्हा ७-स्टार मानांकन मिळाले आहे.
वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये शहराने सांडपाण्याची प्रक्रिया, नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण, उघड्यावर शौचमुक्त क्षेत्र आणि पुनर्वापर यामध्ये १००% अनुपालन साधले आहे.
महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिक, सफाई कर्मचारी, अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे आभार मानत हे यश सर्वांचे असल्याचे सांगितले. पुढील काळात अधिक शाश्वत उपक्रम राबवले जातील, असे ते म्हणाले.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी ‘झिरो वेस्ट’ धोरण, पाण्याचा पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.
आरोग्य उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या टीमवर्कमुळे हे यश शक्य झाले असून, पुढील वर्षी देशात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
या यशामध्ये शाळा, गृहसंघ, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सर्वांनी मिळून प्लास्टिक वापर कमी करणे, कचऱ्याचे वर्गीकरण आणि सार्वजनिक स्वच्छता यामध्ये सातत्य राखले आहे.
पिंपरी चिंचवडने पुन्हा एकदा ‘स्वच्छ शहर’ म्हणून आपली ओळख घट्ट केली असून, हे यश ‘स्वच्छ भारत’च्या दिशेने भक्कम पाऊल आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter