वसईत तृतीयपंथीयांचा वेष घेत शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला. गावकऱ्यांनी चौघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. परिसरात भीतीचं वातावरण.
सायली मेमाणे
वसई २३ जुलै २०२५ : वसईमध्ये चाकूचा धाक दाखवून शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तृतीयपंथीयांच्या वेशात आलेल्या तीन पुरुष आणि एका रिक्षा चालकाने मिळून हा प्रयत्न केला. मात्र सतर्क गावकऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करून या मुलांना वाचवले आणि आरोपींना पकडून बेदम चोप दिला.
ही घटना वसई पश्चिमेतील खोचिवडे गावाच्या कुरणवाडी परिसरात घडली. शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या चार विद्यार्थ्यांना — तीन मुली आणि एक मुलगा — अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्याचा कट रचण्यात आला होता. या तिघांनी तृतीयपंथी असल्याचा भास निर्माण करून लोकांच्या संशयाला फाटा देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलांनी आरडाओरड करताच गावकऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि मुलांना वाचवले.
गावकऱ्यांनी तात्काळ या चौघांना पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांना माहिती दिली. वसई पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात पेट्रोलिंग वाढवले असून, मुलांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आरोपींनी तृतीयपंथींचा वेश धारण करून हे कृत्य केल्याने खरी तृतीयपंथीय समुदाय देखील बदनामीला सामोरे जावं लागलं आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, डोंबिवलीतील पिसोली गावातूनही एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या सोनाली कळासरे या मराठी तरुणीला परप्रांतीय गोकुळ झा या व्यक्तीने रुग्णालयातच बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शोधमोहीम राबवून आरोपीला अखेर नवाळी परिसरातून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
या दोन्ही घटनांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तर दुसरीकडे मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न करून गावकऱ्यांच्या जागरूकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या घटनांमध्ये गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला असून, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter