• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे देहूरोडमध्ये जीवघेण्या खड्ड्यांचा थैमान; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

Jul 24, 2025
देहूरोड शिवाजी विद्यालय चौकामध्ये मोठे खड्डे आणि पाणी साचल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहेदेहूरोड शिवाजी विद्यालय चौकामध्ये मोठे खड्डे आणि पाणी साचल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे

देहूरोड शिवाजी विद्यालय चौकामध्ये मोठे खड्डे आणि पाणी साचल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. नागरिक त्रस्त; कॅन्टोन्मेंट बोर्डावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

सायली मेमाणे

पुणे २४ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील देहूरोड परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय भयावह झाली असून शिवाजी विद्यालयाजवळील चौकामध्ये मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल तयार झाला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनचालक, विद्यार्थी आणि पादचारी प्रवास करत असतात, मात्र रस्त्यांची अवस्था पाहता त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः या भागात गटारांची पाइपलाइन वा पाण्याची पाइपलाइन फुटल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.

या खड्ड्यांमुळे गाडी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण जखमी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी वाहनचालकांना वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी लागत असून खड्डे टाळता टळत नाहीत. परिणामी वाहनांचे एकमेकांवर धडकणे, वादविवाद, शिवीगाळ आणि काही वेळा हाणामारीच्या घटना घडत आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरातील नागरिकांत तीव्र नाराजी आहे. त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले असून अधिकारी कार्यालयात बसून केवळ कागदी कामकाजात व्यस्त असून प्रत्यक्षात रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी काहीच पावले उचललेली नाहीत, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे. ‘एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यानंतरच हे अधिकारी जागे होणार का?’ असा थेट सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

स्थानिकांच्या मते जर या भागात एखादा जीव गेला तर यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड जबाबदार असणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासोबतच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांचा रोष लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune