लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी २०० खाटांची मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : पुणे शहरातील लोहगाव परिसरात नागरीकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यसेवा ही नागरिकांची प्राथमिक गरज बनली आहे. याच गरजेच्या अनुषंगाने लोहगाव येथे उभारण्यात आलेले १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असून, त्याची क्षमता २०० खाटांपर्यंत वाढविण्याची जोरदार मागणी स्थानिक आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस हे रुग्णालय सुरू करण्याची शक्यता असून, या रुग्णालयामुळे ससून रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
आमदार पठारे यांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे रुग्णालयाच्या खाटांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. त्यांनी २०१३ पासून या रुग्णालयासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, प्रशासकीय मंजुरी मिळविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. हे रुग्णालय केवळ लोहगावच नव्हे तर पूर्व पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सासवड, जुन्नर, आळंदी अशा शेजारील परिसरातील नागरिकांसाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
खासगी रुग्णालयांतील उपचार खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना सरकारी रुग्णालय हीच सोयीची आणि विश्वासार्ह सुविधा वाटते. त्यामुळे सध्या उभारले जात असलेले हे रुग्णालय येत्या काळात अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. शिवाय, सध्या लोहगाव परिसरात अंतर्गत आणि बाह्य रिंगरोडचे मोठे प्रकल्प सुरू आहेत, जे या भागाचा विकास आणखी वेगाने घडवून आणतील. त्यामुळे आजच १०० खाटांची क्षमता अपुरी ठरू शकते, हे लक्षात घेऊनच पठारे यांनी या सुविधेचे भविष्य लक्षात घेऊन २०० खाटांची रचना करण्याचा आग्रह धरला आहे.
विकासाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात रुग्णालयासाठी नव्याने जागा मिळणे कठीण असल्यामुळे सध्याच्याच इमारतीत अधिकाधिक आरोग्यसुविधा समाविष्ट करणे हे दूरदृष्टीचे पाऊल ठरेल. स्थानिक नागरिक, ज्यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा एक मोठा आधार आहे, त्यांच्यासाठी हे रुग्णालय म्हणजे एक मोठा दिलासा आहे. अशा सुविधा वाढवल्यास केवळ आरोग्य व्यवस्थेचा दर्जा सुधारेलच, पण स्थानिक लोकसंख्येची शाश्वत गरजही पूर्ण होईल.
हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू करून त्यात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यास लोहगाव परिसर आरोग्यदृष्ट्या सक्षम होईल. शासन आणि प्रशासनाने यासंदर्भातील निर्णय त्वरित घेणे आवश्यक असून, आमदार बापूसाहेब पठारे यांचा सातत्याने चाललेला पाठपुरावा यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. लोहगावसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या परिसरात असा आरोग्यसेवांचा केंद्रबिंदू उभारणे ही काळाची गरज आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter