पुणे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी मोफत ‘वन पुणे विद्यार्थी पास’ योजना सुरू केली असून, दररोज ३०% प्रवास सवलतीचा लाभ मिळणार आहे. ऑफर २५ जुलै ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : पुणे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि स्वागतार्ह योजना जाहीर केली आहे. ‘वन पुणे विद्यार्थी पास’ या योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासासाठी दररोज ३०% सवलत मिळणार असून हे कार्ड पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे मेट्रोचे पहिले टप्पेतील काम पूर्ण झाले असून सध्या २९ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू आहे. दररोज जवळपास १.९ लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी महा मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी ही विशेष ऑफर सादर केली आहे.
ही सवलत योजना २५ जुलै २०२५ पासून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत लागू असणार आहे. या कालावधीत पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ‘वन पुणे विद्यार्थी पास कार्ड’ मोफत दिले जाणार आहे. याआधी रु. ११८ मध्ये मिळणारे हे कार्ड आता कोणतीही किंमत न देता विद्यार्थ्यांना मिळणार असून, केवळ रु. २०० चे किमान टॉप-अप करणे अनिवार्य आहे. ही रक्कम पूर्णतः प्रवासासाठी वापरता येणार आहे आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
विद्यार्थ्यांना या कार्डाच्या साहाय्याने मेट्रो प्रवासात दररोज ३०% सवलत दिली जाणार आहे. ही सवलत त्यांच्या दररोजच्या शिक्षण प्रवासाचा खर्च कमी करेल आणि त्यांना सुरक्षित, वेगवान व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळवून देईल. विशेष म्हणजे, १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना हे पास कार्ड त्यांच्या पालकांच्या नावावर देण्यात येईल आणि त्यासाठी पालकांची KYC आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचीही KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांनी स्पष्ट केले की, “विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आणि त्यांचा शिक्षणप्रवास अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने आम्ही ही योजना राबवत आहोत. शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था आणि त्यांचे विद्यार्थी या सुविधेचा लाभ घ्यावा.”
ही योजना केवळ विद्यार्थ्यांनाच आर्थिक सवलत देत नाही, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी बनवण्याचा आणि नागरिकांमध्ये मेट्रोविषयी विश्वास निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या योजनेचा लाभ घेतल्याने रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होईल, वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल. त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक नाही, तर पर्यावरणपूरक शहरासाठीही एक सकारात्मक पाऊल आहे.
पुणे मेट्रोने सर्व पात्र विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही योजना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असून त्यांचा शिक्षणप्रवास अधिक सुलभ, स्वस्त आणि सोयीस्कर होईल. महा मेट्रोच्या या उपक्रमामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter