वाराणसीमध्ये एक वृद्ध डॉक्टर गे ॲपवरून विकास नावाच्या तरुणाच्या जाळ्यात सापडले. नग्न फोटोच्या आधारे ८ लाख रुपयांची ब्लॅकमेलिंग. पोलिसांकडून गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : वाराणसीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका ६५ वर्षीय वृद्ध डॉक्टरला गे ॲपवरून तरुणाशी ओळख होणे चांगले न ठरता, उलट त्यांच्यासाठी मोठी आर्थिक आणि मानसिक फसवणूक ठरली. ‘लुकिंग 4 मॅच्युअर’ या प्रोफाईलवरून ओळख झालेल्या एका विकास नावाच्या तरुणाने वृद्ध डॉक्टर नवीन नंद यांच्याशी संपर्क साधला. हे दोघे 20 जुलै रोजी हॉटेलमध्ये भेटले. सुरुवातीला दोघांनी एकत्र बीयर प्यायली. त्यानंतर डॉक्टरांनी कपडे काढताच विकासने त्यांचे नग्न फोटो काढले आणि त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
विकासने डॉक्टर नवीन नंद यांना धमकी दिली की, जर पैसे दिले नाहीत तर हे अश्लील फोटो त्यांच्या कुटुंबीयांना व मित्रांना पाठवेल. एवढ्यावरच न थांबता त्याने स्वतःला राजकारणी आणि गुन्हेगारी संपर्क असलेला असल्याचे सांगून डॉक्टरांच्या थोबाडीत मारले. त्यानंतर हातातला ग्लास फोडून काच तुकडे गळ्यावर ठेवत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
भीतीने ग्रासलेल्या डॉक्टरांनी विकासच्या मागणीनुसार UPI द्वारे त्याला पैसे पाठवले. एकूण आठ लाख रुपये डॉक्टरांनी ट्रान्सफर केले. परंतु पैसे ट्रान्सफर करताना त्यांना UPI आयडीवर ‘आरव पांडे’ आणि ‘रोशन पाठक’ अशी नावे दिसली, ज्यामुळे हा एक सुसंगठित फसवणूक रॅकेट असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घटनेनंतर डॉक्टर नवीन नंद यांनी सिगरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ अज्ञात आरोपीविरुद्ध BNS च्या कलम 308 (हत्येचा प्रयत्न) आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
ही घटना केवळ वैयक्तिक फसवणूक नसून, डिजिटल डेटिंग आणि सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून वाढणाऱ्या सायबर ब्लॅकमेलिंगच्या घटनांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, अनोळखी व्यक्तींसोबत वैयक्तिक माहिती शेअर करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter