भारतीय विमान कंपन्यांमधील तांत्रिक दोषांबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत दिलेली माहिती चिंताजनक आहे. एअर इंडिया समूहाच्या विमानांमध्ये सर्वाधिक ८५ दोष नोंदवले गेले आहेत, तर इंडिगो, आकासा आणि स्पाइसजेट यांनाही त्रुटींची माहिती द्यावी लागली आहे.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : नवी दिल्ली : भारतातील नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंतेची बाब ठरू शकणारा अहवाल समोर आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये २१ जुलैपर्यंत देशातील पाच प्रमुख विमान कंपन्यांनी एकूण १८३ तांत्रिक दोष नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) नोंदवले आहेत. या आकड्यात सर्वाधिक दोष ‘एअर इंडिया’ समूहाच्या विमानांमध्ये आढळले असून त्यांची संख्या ८५ इतकी आहे.
या अहवालानुसार, इंडिगोने ६२, आकासाने २८, स्पाइसजेटने ८ दोष नोंदवले आहेत. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने एकत्रित ८५ दोषांची नोंद केली आहे. यामुळे एअर इंडिया समूहाचे विमानसेवा सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रस्थानी आले आहेत. मागील वर्षी (२०२४) ४२१ तांत्रिक दोष नोंदवले गेले होते, तर २०२३ मध्ये हा आकडा ४४८ आणि २०२२ मध्ये ५२८ इतका होता. २०२१ मध्ये ५१४ तांत्रिक त्रुटी नोंदवल्या गेल्या होत्या. या आकडेवारीत अलायन्स एअर आणि विस्तारा सारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत लेखी उत्तरात म्हटले की, “विमान कंपन्यांनी DGCA कडे नोंदवलेल्या प्रत्येक तांत्रिक दोषाची चौकशी केली जाते. विशेषतः गंभीर त्रुटींची चौकशी त्वरीत पूर्ण केली जावी, जेणेकरून वेळेत सुधारणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील.” DGCA तर्फे या त्रुटींवर तात्काळ कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दिल्ली-मुंबई विमानात ३ जुलै रोजी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या या विमानात सुमारे १६० प्रवासी होते. सुरक्षेला प्राधान्य देत वैमानिकांनी उड्डाण रद्द केले. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती.
भारतातील विमान वाहतूक क्षेत्र झपाट्याने वाढत असून दररोज हजारो प्रवासी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करतात. अशा परिस्थितीत विमाने तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. वारंवार होणारे तांत्रिक दोष आणि उड्डाण रद्द होणे प्रवाशांच्या विश्वासाला धक्का देणारे ठरू शकते. त्यामुळे DGCA व मंत्रालयाने या बाबतीत कठोर उपाययोजना करून कंपन्यांना जबाबदार धरणे गरजेचे आहे.
एअर इंडिया, इंडिगो, आकासा, स्पाइसजेट या विमान कंपन्यांकडून विमानांच्या देखभालीबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. भारत सरकारने या क्षेत्रातील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित विमान कंपन्यांकडून दोषमुक्त सेवेसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे अपेक्षित आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter