जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात एका अग्निवीराला वीरमरण आले असून दोन जवान जखमी झाले आहेत. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
सायली मेमाणे
पुणे २६ जुलै २०२५ : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या घृणास्पद कारवायांनी जवानांचे बलिदान घेतले आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेपासून काही अंतरावर शुक्रवारी झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्करातील एका अग्निवीर जवानाला वीरमरण आले असून दोन इतर जवान गंभीर जखमी झाले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
स्फोट शुक्रवार, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील सलोत्री गावाजवळील व्हिक्टर पोस्टजवळ घडला. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंगदरम्यान जाट रेजिमेंटच्या नायब सुभेदार हरि राम, हवालदार गजेंद्र सिंह आणि अग्निवीर ललित कुमार हे आघाडीच्या चौक्यांजवळ गस्त घालत होते. याच दरम्यान अचानक भूसुरुंग स्फोट झाला.
या भयानक स्फोटात अग्निवीर ललित कुमार यांनी वीरमरण पत्करले. तर नायब सुभेदार हरिराम आणि हवालदार गजेंद्र सिंह गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमी जवानांना एअर लिफ्टद्वारे उधमपूर येथील सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सैन्य सूत्रांनी सांगितले आहे.
या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ (द रेसिस्टन्स फ्रंट) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. टीआरएफ ही पाकिस्तानमधील कुख्यात लष्कर-ए-तोयबाची एक प्रॉक्सी संघटना आहे. काही दिवसांपूर्वीच पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवर हल्ल्याचाही टीआरएफने स्वीकार केला होता. नियंत्रण रेषेजवळ अशा प्रकारचा स्फोट घडवून आणून दहशतवादी पुन्हा एकदा सीमेवर अस्थिरता निर्माण करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. स्फोट घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा या दहशतवादी कारवायांचा तीव्र निषेध करत असून, संबंधित अतिरेक्यांवर कठोर कारवाई करण्याची तयारी दाखवली आहे.
दरम्यान, व्हाईट नाईट कोअरच्या वतीने वीरमरण पत्करलेल्या अग्निवीर ललित कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या बलिदानाची संपूर्ण राष्ट्राला अभिमान असून, हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास सैन्याने व्यक्त केला आहे.
हा स्फोट आणि त्यानंतरची कारवाई ही जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि दहशतवाद्यांच्या हालचालींचा स्पष्ट इशारा आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा संपूर्ण देशात सैन्यदलाच्या शौर्याचे आणि बलिदानाचे कौतुक होत आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter