डोंबिवली पश्चिमेत फळ विक्रेत्याने घाणीच्या पाण्यात केळी धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल. आरोग्य धोक्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप; स्थानिक नेत्याने घटनेचा घेतला व्हिडीओ.
सायली मेमाणे
डोंबिवली २६ जुलै २०२५ : डोंबिवली पश्चिमेतून एक अति किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाच्या साचलेल्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्यात चक्क फळ विक्रेत्याने केळी धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना डोंबिवली पश्चिमेतील गोकुळ बंगला परिसरात घडली असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख राजेंद्र सावंत यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा धक्कादायक प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून कैद केला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, फळ विक्रेता साचलेल्या गटाराच्या पाण्यात केळी धुत आहे आणि त्यानंतर ती विक्रीस ठेवत आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम
या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा अस्वच्छ आणि दूषित पाण्यात धुतलेली फळं नागरिकांच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम करू शकतात. पावसाळ्यात आधीच डेंग्यू, टायफॉइड आणि अन्य पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढलेले असताना, अशा प्रकारचे बेफिकीर वर्तन जीवघेणं ठरू शकतं.
फळ विक्रेत्याची मुजोरी
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित फळ विक्रेत्याची भूमिका. जेव्हा स्थानिकांनी आणि राजकीय प्रतिनिधींनी त्याला जाब विचारला, तेव्हा त्याने उद्धटपणे उत्तर दिलं की, “माझं नुकसान तुम्ही भरून देणार का?” या उत्तराने नागरिकांमध्ये अधिकच संताप पसरला आहे.
नागरिकांची मागणी – प्रशासनाने कारवाई करावी
सदर प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे. अस्वच्छतेत अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर पावले उचलणं गरजेचं आहे. स्थानिक महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी यावर त्वरित लक्ष देऊन संबंधित विक्रेत्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सामाजिक माध्यमांवर संताप
हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, अनेकांनी कमेंट करत प्रशासनाच्या उदासीनतेवर निशाणा साधला आहे. “आपण काय खातोय, कुठून येतंय हे पाहण्याची गरज आहे”, “हे आरोग्याशी खेळणं आहे”, “अशा विक्रेत्यांना परवानेच रद्द करावेत”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter