वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पुण्यातील बालगंधर्व कलादालनात विशेष कला प्रदर्शनाचे आयोजन. भारतमातेच्या चित्रांमधून स्वातंत्र्यसंघर्षाची जिवंत मांडणी, ८ ते १२ एप्रिल रोजी.
पुणे – वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त आणि ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या १३१ व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व कलादालनात एक विशेष कला प्रदर्शन भरविण्यात येत आहे. हे प्रदर्शन स्वातंत्र्य संग्रामातील वंदे मातरमच्या भूमिकेचा आढावा घेणाऱ्या चित्रांच्या माध्यमातून इतिहास जिवंत करते.
८ ते १२ एप्रिलदरम्यान दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ८ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. उद्घाटन समारंभ मंगळवारी (८ एप्रिल) संध्याकाळी ५:३० वाजता खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी चित्रकार चंद्रशेखर जोशी आणि अनिल उपळकर हे मान्यवर उपस्थित राहतील.
प्रदर्शनात भारतमातेच्या विविध शैलीतील चित्रांचे दर्शन घडवले जाणार असून, वंदे मातरम गीताची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचाल साकारली जाणार आहे. या चित्रांमधून देशभक्ती, संघर्ष आणि संस्कृतीचा अभिमान यांचा अमूल्य ठसा पाहायला मिळेल.
प्रदर्शनाचे आयोजक मकरंद केळकर आणि वंदे मातरम अभ्यासक मिलिंद साबनीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. “हे प्रदर्शन केवळ इतिहासाचे स्मरण नाही, तर आजच्या तरुण पिढीत देशभक्ती जागवण्याचा प्रयत्न आहे,” असं ते म्हणाले.
स्वातंत्र्यलढ्याचे उमदं दर्शन घडवणाऱ्या या कलाप्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.