विमान नगरमध्ये तरुणावर बाटली आणि दगडाने हल्ला; विमानतळ पोलिसांनी २४ तासांत दोन आरोपींना घेतले अटक. पीडिताला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुणे, १३ मे २०२५: विमान नगरमधील गंगापूरम सोसायटीजवळ एका २३ वर्षीय तरुणावर विनाकारण हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित अनासफ्रेंड जनारस डीसोझा यांनी विमान नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, केवळ २४ तासांत पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
११ मे रोजी संध्याकाळी ७:४० च्या सुमारास ही घटना घडली. डीसोझा हे आपल्या दुचाकीसह सोसायटीच्या गेटजवळ उभे असताना, एका अंदाजे २३ वर्षांच्या अनोळखी तरुणाने अचानक पाण्याच्या बाटलीने त्यांच्या डोक्यावर मारले. कारण विचारल्यावर त्या तरुणाने शिवीगाळ करत तिथून निघून जाण्याची धमकी दिली आणि दगड फेकण्याची धमकीही दिली.
त्यानंतर त्याने जवळच पडलेला दगड उचलून डीसोझा यांच्या छातीवर आणि हातावर फेकून मारला. जखमी झाल्यानंतर डीसोझा यांनी तात्काळ त्या ठिकाणाहून दुचाकीवरून निघून जात वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतले.
विमान नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याबाबत न्यूज़डॉट्जने संपर्क साधला असता, विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय साकेेश्वरी यांनी घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हल्ल्यात सामील असल्याच्या संशयावरून दोन तरुणांना २४ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तपास सुरू आहे.
https://www.instagram.com/p/DJtC0Ftzq6d