• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

पुण्यात कोरोनाचे सक्रिय १५ रुग्ण : रुग्णवाढ सौम्य, चिंता वाढते

May 26, 2025
पुण्यात कोरोनाचे सक्रिय १५ रुग्णपुण्यात कोरोनाचे सक्रिय १५ रुग्ण

पुण्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण १५ वर पोचले असून, त्यातील बहुतांश महापालिका हद्दीत आढळले आहेत. राज्यात २०९ सक्रिय रुग्णांची नोंद.
सायली मेमाणे,

पुणे २५ मे २०२५ : पुण्यात कोरोनाचे सक्रिय १५ रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून, यामध्ये सातत्याने सौम्य वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रविवारी पुण्यात आठ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, त्यामुळे एकूण सक्रिय रुग्णसंख्या १५ वर पोहोचली आहे. यापैकी एक रुग्ण ग्रामीण भागातील असून, उर्वरित १४ रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील आहेत. नागरिकांमध्ये चिंता वाढत असली, तरी रुग्णांची लक्षणे सौम्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात २४ आणि २५ मे रोजी अनुक्रमे ४७ आणि ४५ नवीन रुग्ण आढळले आहेत. २४ मे रोजी मुंबईत ३०, पुण्यात ७, नवी मुंबईत ३, ठाणे महापालिकेत ६ आणि नागपूरमध्ये १ रुग्ण सापडला होता. २५ मे रोजी मुंबईत ३५, पुण्यात ७ आणि पुणे ग्रामीणमध्ये १ नवीन रुग्ण नोंदविण्यात आला. यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या २०९ वर पोचली आहे.

साथरोग नियंत्रण विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत सात हजार ३७९ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामधून आतापर्यंत ८७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, हे सर्व रुग्ण गंभीर सहव्याधींनी ग्रस्त होते.

मुंबईसारख्या महानगरांमध्ये सौम्य स्वरूपाची वाढ असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बहुतेक रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत असून, सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध आहे. इन्फ्लुएन्झासदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन संसर्ग (SARI) रुग्णांची नियमित तपासणीही सुरूच आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्याची वाढ ही मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य नसून, ती सध्याच्या हवामानातील बदलांमुळे देखील होऊ शकते. नागरिकांनी मास्क, स्वच्छता आणि सामाजिक अंतर यासारख्या प्राथमिक प्रतिबंधक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

पुण्यात कोरोनाचे सक्रिय १५ रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध, सॅनिटायझरचा वापर, मास्कची सक्ती यासारखे नियम पुन्हा अंमलात आणण्याची शक्यता आहे.

शासकीय यंत्रणांनी नागरिकांना घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, मृत्युदर कमी आहे. परंतु, गंभीर सहव्याधी असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे सुचवण्यात आले आहे.