सिन्नर बस स्थानकाच्या छताचा भाग पावसामुळे कोसळून शिवशाही बसेस आणि इतर वाहनांचे नुकसान. मनुष्यहानी टळली; भ्रष्टाचाराचा आरोप.
सायली मेमाणे
पुणे २५ मे २०२५. :सिन्नर बस स्थानक छत कोसळले असून, पावसामुळे घडलेली ही दुर्घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाचे छत कोसळून मोठा अपघात झाला. या घटनेत शिवशाही बसेससह एक कारही पूर्णपणे धुळीस मिळाली. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.
पावसामुळे छताचा स्लॅब अचानक कोसळल्याने शिवशाही बसेस आणि कारचे मोठे नुकसान झाले. छत कोसळताना एका बसमध्ये प्रवासी उपस्थित होते, मात्र त्यांना वेळेवर बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये कोणताही जीवितहानीचा प्रकार नोंदवलेला नाही.
राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, सातारा, नगर आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे हवामान विभागाने नोंदवले. पुणे वेधशाळेने पुढील दोन दिवसात जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे.
सिन्नर बस स्थानक छत कोसळले या घटनेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते उदय सांगळे यांनी या दुर्घटनेला भ्रष्टाचाराचा नमुना म्हणत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भावाकडेच या बस स्थानकाचे कंत्राट दिले गेले होते, असा आरोप केला. त्यांनी मागणी केली की, या बसस्थानकाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करावे व दोषींवर कारवाई करावी.
माहितीनुसार, या बसस्थानकाच्या छताचे काम कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतूनच झाले असून, त्यांचेच कार्यालय देखील याच स्थानकात आहे. त्यामुळे या दुर्घटनेमागे निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि शासकीय यंत्रणांच्या हलगर्जीपणाचा भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसामुळे सिन्नर बस स्थानक छत कोसळले हे प्रकरण केवळ अपघात न राहता, सार्वजनिक बांधकामांतील भ्रष्टाचार, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि जबाबदारी ठरवण्याची गरज याची जाणीव करून देणारे ठरत आहे.