नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र 2047 व्हिजन, परकीय गुंतवणूक, उद्योग धोरण, पायाभूत प्रकल्प यावर सविस्तर भाष्य केले.
सायली मेमाणे,
पुणे २५ मे २०२५. : नुकत्याच पार पडलेल्या नीती आयोगाच्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या समृद्ध भविष्यासाठी आखण्यात आलेल्या योजनांचा आणि धोरणांचा सविस्तर आढावा दिला. फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे आभार मानून केली. त्यांनी नमूद केले की, दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणाचे हे एक ठोस उदाहरण आहे.
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय धोरणाशी सुसंगतपणे राज्यासाठी ‘महाराष्ट्र 2047 व्हिजन’ हा दीर्घकालीन विकास आराखडा तीन टप्प्यांमध्ये तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यात 2029 पर्यंतचे अल्पकालीन, 2035 पर्यंतचे मध्यमकालीन आणि 2047 पर्यंतचे दीर्घकालीन उद्दिष्ट समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आधी 100 दिवसांचा सुशासन कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला असून आता पुढील 150 दिवसांसाठी नवीन टप्पा सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये विविध विभागांनी 700 हून अधिक उद्दिष्टे गाठल्याचे सांगण्यात आले.
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की राज्याची विद्यमान अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर इतकी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या उद्योग धोरणामध्ये राज्याच्या GDP मध्ये उत्पादन क्षेत्राचे योगदान 20 टक्क्यांच्या पुढे नेण्यावर भर दिला आहे. EV, सेमिकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि डेटा सेंटर्स या नवउद्योग क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मैत्री 2.0’ ही एक खिडकी योजना लागू करण्यात आली आहे.
2024-25 च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्राने देशात सर्वाधिक 1.39 लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. याशिवाय दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये 15.96 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून, त्यातील जवळपास 50 टक्के प्रस्तावांवर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक प्रामुख्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरांतील शहरांमध्ये होत आहे, हे राज्याच्या समतोल विकासाचे लक्षण मानले जात आहे.
पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, मेट्रो प्रकल्प, रेल्वे सुधारणा आणि मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क यासारखे महत्त्वाचे प्रकल्प वेगात सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे राज्याच्या एकूण विकासाला आणि रोजगारनिर्मितीस मोठी चालना मिळत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले.
या बैठकीनंतर फडणवीस यांनी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना महाराष्ट्र विधानमंडळात सर्वपक्षीय सत्कार देण्याचे निमंत्रण देण्यात आले असून, भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देण्याची विनंतीही करण्यात आली.