बारामतीत एका दिवसात विक्रमी 7 मिमी पाऊस; नीरा कालवा फुटल्याने पूरस्थिती, माळशिरसात 500 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर.
सायली मेमाणे,
पुणे २५ मे २०२५. : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मुसळधार हजेरी लावल्यामुळे बारामती, माळशिरस आणि परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामती तालुक्यात अवघ्या एका दिवसात तब्बल 7 मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे अनेक भागांत घरात पाणी शिरले आणि शेतजमिनींवर पाणी साचले. यामुळे शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ आली आहे.
बारामती शहरात नीरा डावा कालवा फुटल्याने पाणी मोठ्या वेगाने पालखी महामार्गावर आले आणि काटेवाडी-भवानीनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सुमारे दीडशे घरांमध्ये पाणी घुसले असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी सोमवारी पहाटे बारामती आणि परिसरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकाऱ्यांना आपत्कालीन मदत कार्य सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. अजित पवारांनी सांगितले की, “बारामतीमध्ये वर्षभरात साधारणतः 14 मिमी पाऊस होतो, पण त्यापैकी निम्मा म्हणजेच 7 मिमी पाऊस एका दिवसात पडल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.”
कान्हेरी गावात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा प्रत्यक्ष पवारांना दाखवून नुकसान दर्शवले. नीरा डावा कालवा फुटल्यानंतर अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. मागील 5 दिवसांत तालुक्यात सुमारे 314 मिमी पावसाची नोंद झाली असून, बारामतीमध्ये एकूण वार्षिक पावसाचे प्रमाण 450 मिमी असते.
दुसरीकडे, माळशिरस तालुक्यात पूरस्थिती अधिक तीव्र झाली आहे. नीरा नदीला पूर आल्यामुळे नातेपुते–बारामती रस्त्यावरील कुरभावी परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सोमवारी पहाटे एनडीआरएफच्या पथकाने एका रानात अडकलेल्या कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढले. संग्रामनगर परिसरातील 20 कुटुंबांनाही तातडीने हलवण्यात आले असून, त्यांच्या घरांमध्येही पाणी शिरले आहे.
प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील सुमारे 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुढील काही दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे.