पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असून, गेल्या पाच महिन्यांत ६ आणि वर्षभरात २१ गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. कोयत्याच्या दहशतीनंतर आता पिस्तूलधारी गुन्हेगारांची दहशत वाढली आहे.
सायली मेमाणे
पुणे : २७ मे २०२४ : पुण्यात गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, आता किरकोळ वादातही पिस्तूल चालवली जात आहेत. शांतता प्रिय शहरात कोयत्याच्या दहशतीनंतर आता ‘ढिशक्यांव-ढिशक्यांव’चा आवाज नागरिकांच्या मनात भीती निर्माण करतो आहे. गेल्या पाच महिन्यांत सहा गोळीबाराच्या घटना घडल्या असून, गेल्या वर्षभरात हा आकडा तब्बल २१ वर पोहोचला आहे. या घटनांमधून थेट जीव घेण्यापेक्षा दहशत माजवणे, गुन्हेगारी वर्चस्व दर्शवणे हे उद्दिष्ट असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारी लाठीकाठ्यांपासून थेट पिस्तूलाच्या वापरापर्यंत गेली असून, कोयत्याची दहशत निर्माण झाल्यानंतर आता त्यासोबतच पिस्तूल वापरण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. उपनगरांपासून शहराच्या मध्यवर्ती भागांपर्यंत गोळीबाराचे प्रकार घडत असून, यामध्ये जुने व नवे गुन्हेगार सामील आहेत. शिवसेना (शिंदे गट) युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर झालेल्या गोळीबारापासून ते मंगळवार पेठेतील किरकोळ वादातून झालेल्या गोळीबारापर्यंतच्या घटनांमधून ही गुन्हेगारी पद्धत स्पष्ट होते.
कोयत्यासोबत पिस्तूल वापरण्याचा पॅटर्न स्थिर होत असून, अनेक गुन्हेगार कोयत्याने सुरुवात करून नंतर पिस्तूलाने ‘शो ऑफ पॉवर’ करतात. शरद मोहोळ आणि वनराज आंदेकर यांच्या हत्यांमध्ये देखील अशाच प्रकारे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरात पिस्तूलांचा वापर फक्त जीवघेणा न राहता, दहशतीसाठीही केला जात आहे.
हे पिस्तूल सहज कुठून येतात, याबाबत तपास केला असता समोर आले की, ही शस्त्रे बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातून आणली जातात. स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांकडून ती पुण्यात दुप्पट दराने विकली जातात. पूर्वी दोन स्वतंत्र टोळ्या – एक पिस्तूल पुरवणारी व दुसरी विक्री करणारी – कार्यरत होत्या, पण आता ही यंत्रणा एकसंध झाली आहे. पाच हजार रुपयांत विकत घेतलेली पिस्तूल पुण्यात १० ते १५ हजारांत विकली जात असल्याने अनेकजण या रॅकेटमध्ये सामील होत आहेत.
गेल्या काही महिन्यांतील काही महत्त्वाच्या गोळीबाराच्या घटनांचा आढावा घेतल्यास वाडेबोल्हाईत किरकोळ वादानंतर हवेत गोळीबार, कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून खून, बिबवेवाडीत जामिनावर सुटलेल्या गुंडावर गोळीबार, कोंढव्यात गुन्हेगारांच्या बैठकीत चुकून झालेला गोळीबार, जिल्हा प्रमुखाच्या गाडीवर गोळीबार आणि मंगळवार पेठेतील गोळीबार यांचा समावेश होतो.
पोलिसांकडून या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असले तरी, पिस्तूल सहज उपलब्ध होत असल्यामुळे गुन्हेगारांना रोखणे अधिक कठीण होत आहे. पुण्यात गोळीबाराच्या घटना आता केवळ गुन्हेगारी नव्हे तर नागरी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर संकट बनू लागल्या आहेत.