पुण्यातील छत्रपती शाहू महाराज चौक परिसरात महापालिकेच्या डंपरखाली आल्याने एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला. डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
सायली मेमाणे,
पुणे : २८ मे २०२५ : पुण्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या डंपरच्या चाकाखाली येऊन एका २३ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२७ मे) दुपारी साडेएकच्या सुमारास छत्रपती शाहू महाराज चौकाजवळ, कॉमर झोनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडली.
मृत विद्यार्थिनीचे नाव एकता भरत पटेल (वय २३, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) असे असून, ती लोहगाव येथील मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. अपघाताच्या वेळी एकता मोपेडवरून कॉमर झोनच्या दिशेने जात होती. त्या दरम्यान महापालिकेचा डंपर मागून आला आणि त्याचे एक चाक थेट तिच्या डोक्यावरून गेले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली व जागीच मृत्यू झाला.
विश्रांतवाडी पोलिसांनी डंपरचालक त्रंबक शेरखाने (वय ३८, रा. औंध कॅम्प) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे एकताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या मित्र-मैत्रिणींनीही ससून रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डंपर आणि इतर जड वाहनांच्या बेकायदेशीर व बेफिकीर वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाने अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.