कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात १७६ हरिणवर्गीय शिंगांचे कायद्यानुसार आणि पारदर्शक पद्धतीने नष्टीकरण करण्यात आले.
पुणे, 27 मे 2025 – कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आज वन्यप्राण्यांच्या गळून पडलेल्या शिंगांचे अधिकृतरीत्या नष्टीकरण करण्यात आले. ही कार्यवाही केंद्र सरकारच्या “Wildlife Disposal of Wild Animal Article Rules, 2023” या नियमानुसार राबवण्यात आली असून, शिंगांचे नाश पर्यावरणपूरक आणि कायदेशीर पद्धतीने करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या विनंतीवरून आणि उपवनसंरक्षक (प्रादेशिक) श्री. तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता संग्रहालय परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई पार पडली.
या प्रक्रियेत सांबर, चितळ आणि भेकर या प्रजातींच्या एकूण १७६ शिंगांचा समावेश होता. ही सर्व शिंगे नैसर्गिकरित्या गळून पडलेली होती. त्यांचे संकलन केल्यानंतर ती शिंगे संग्रहालयात असलेल्या आधुनिक ज्वलन तंत्रज्ञानाचा वापर करून नष्ट करण्यात आली.
संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात आली, तसेच व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि पंचनामा करण्यात आला. नष्टीकरणास उपस्थित असलेल्यांमध्ये उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वन अधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि मानद वन्यजीव रक्षक यांचा समावेश होता.
वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अवशेष सुरक्षितपणे नष्ट करण्याची ही कारवाई म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण, नैतिक हाताळणी आणि गैरवापरास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. अशा कार्यवाहीतून इतर प्राणी संग्रहालयांसाठीही मार्गदर्शक उदाहरण उभे राहते, असे वन विभागाचे मत आहे.