बेशिस्त वाहन चालकांवर एआय ची नजर ठेवण्यासाठी फर्ग्युसन रस्त्यावर बसवण्यात आलेले एआय कॅमेरे वाहतूक सुधारण्यास कसे मदत करत आहेत.
सायली मेमाणे,
पुणे ३० मे २०२५ : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी वाहतूक विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. फर्ग्युसन रस्त्यावर (नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्ग) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कॅमेरे बसवण्यात आले असून, हे कॅमेरे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची ओळख पटवतात. उल्लंघन झाल्यावर काही सेकंदांत छायाचित्र टिपले जाते आणि वाहन क्रमांकासह थेट ऑनलाइन दंड पाठवला जातो.
फर्ग्युसन रस्त्यावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पोलिसांना वेळोवेळी वाहनचालकांशी वाद घ्यावे लागत होते. पण आता एआय प्रणालीमुळे वाहन चुकीच्या ठिकाणी उभे असल्यास ते एका मिनिटात हलवावे लागेल, अन्यथा थेट दंड आकारला जाणार आहे. दुहेरी पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहने आणणे किंवा दीर्घकाळ रस्त्यावर वाहन उभे ठेवणे यांसारख्या नियमभंगांवरही ही प्रणाली अचूक कारवाई करेल.
या उपक्रमाचे उद्घाटन पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते झाले असून, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे आणि पोलिस निरीक्षक सुनील गवळी आदी अधिकारी उपस्थित होते. ही यंत्रणा गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज प्रवेशद्वारापर्यंत कार्यरत असून, भविष्यात शहरातील इतर गर्दीच्या मार्गांवरही राबवण्यात येणार आहे.
वाहतूक शिस्त राखण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांनी सहकार्य करून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत आणि जेवणाच्या वेळेत रस्त्यांवर वाहने उभी ठेवणाऱ्या वाहनधारकांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे.