शहरात वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने उपचारासाठी नवे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रेमडेसिवीर वापर, स्टिरॉइड्सबाबत सूचना आणि जनुकीय चाचणीसाठी नवे नियम लागू.
सायली मेमाणे,
पुणे ३० मे २०२५ : शहरात अलीकडे काही दिवसांत पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत असल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपचारप्रक्रियेसंदर्भात नवीन सूचना जारी केल्या आहेत. या नव्या तत्त्वांनुसार रुग्णाच्या प्रकृतीची तीव्रता, वय, आणि ऑक्सिजनची पातळी पाहून औषधोपचार ठरवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ज्या रुग्णांना सहव्याधी आहेत आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यासाठी रेमडेसिवीर हे औषध तीन ते पाच दिवस देण्याचे सूचित करण्यात आले आहे.
राज्यातील काही भागांत तसेच सिंगापूर व हाँगकाँगसारख्या ठिकाणीही रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीत साथीचे आजार तज्ज्ञ डॉ. वैशाली जाधव, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. ज्योती गुरव, ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर आदी सहभागी झाले.
नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, सौम्य लक्षणे असलेल्या अथवा लक्षणविरहित रुग्णांना अँटिव्हायरल औषधे देणे टाळावे. तसेच फ्लू सदृश लक्षणे असलेल्या रुग्णांवर स्टिरॉइड्स देऊ नयेत, यावरही भर देण्यात आला आहे. डेक्सामेथासोनसारख्या औषधांचे अनावश्यक प्रमाण रोखण्याची सूचना करण्यात आली आहे.
खासगी रुग्णालयांना देखील बाधित रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आवश्यक असल्यास ३ दिवसांच्या अंतराने चाचण्या कराव्या लागतील.
ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांनाच रेमडेसिवीर औषध दिले जाईल. तसेच डी-डायमर पातळी वाढलेली असल्यास, रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर करून उपचार करावेत, असे नमूद करण्यात आले आहे.