पिंपरी चिंचवड डासजन्य रोग नियंत्रणासाठी महापालिकेकडून कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबवली जात आहे. डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.
सायली मेमाणे
पुणे ४ जून २०२५ : पिंपरी चिंचवड डासजन्य रोग नियंत्रण मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाने अधिक तीव्र केली असून, डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर डासजन्य आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी शहरभर व्यापक स्वरूपात कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रभाग स्तरावर आरोग्य निरीक्षक आणि फील्ड कर्मचारी घराघरांत जाऊन डासांची उत्पत्ती होऊ शकणाऱ्या ठिकाणांची तपासणी करत आहेत.
या मोहिमेंतर्गत पाण्याचे साठे असलेल्या टाक्या, ड्रम्स, कुंड्या, फुलदाण्या, वापरात नसलेल्या टायर आणि कुलर्स यांसारख्या स्थळांची तपासणी केली जात असून, अळ्या आढळून आल्यास संबंधित नागरिकांना नोटीस देऊन दंड आकारण्यात येत आहे. अळीनाशक म्हणून टेमिफॉस औषधांचा वापर करण्यात येत असून काही परिसरांमध्ये गप्पी मासे सोडून डासांच्या अळ्यांचे जैविक नियंत्रण केले जात आहे.
महापालिकेने नागरिकांना सूचित केले आहे की, पाण्याचे साठे झाकून ठेवावेत, घराच्या परिसरात पाणी साचू नये यासाठी काळजी घ्यावी आणि दर आठवड्याला पाण्याच्या साठ्यांची स्वच्छता करावी. कंटेनर सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे बंधनकारक असून, अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
जर डासांची उत्पत्ती होण्यासारखी परिस्थिती कोणालाही आढळल्यास, त्यांनी त्वरित महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरही अपडेट्स पाहता येतील. आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की डासजन्य रोगांविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबवण्यात येणार आहेत.