राज ठाकरे पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत; मनसेच्या प्रमुख बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता.
सायली मेमाणे
पुणे ४ जून २०२५ : राज ठाकरे पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत समोर आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पातळीवरील बैठका आणि राजकीय हालचालींनी यास पुष्टी दिली आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यात युतीच्या चर्चा सुरू असतानाच, मनसेने मात्र ‘एकला चलो रे’ या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्धार केल्याचे चित्र आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून, त्या वेळी पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत पक्ष संघटनेत मोठे फेरबदल, शाखाप्रमुखांची नियुक्ती आणि गटप्रमुखांच्या नवीन निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी नव्या पदांची निर्मितीही होणार आहे.
मनसे पुण्यातील सर्व १६२ प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचे प्राथमिक संकेत आहेत. पुण्यात नुकतीच झालेली शहर कार्यकारिणीची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली असून, ती बैठकीतील चर्चेमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
या घडामोडींमुळे पुणे महापालिकेतील निवडणुकीच्या रंगतदार शर्यतीला अधिक धार येणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता स्वबळावर लढण्यास सज्ज असलेली मनसे – अशा प्रमुख पक्षांमध्ये चुरस होणार असल्याचे निश्चित दिसत आहे.