मुंबईतील मालाड परिसरात दुधाच्या टँकरमधून १६० लिटर दूध चोरी करून त्यात पाणी मिसळल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी चार जणांविरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायली मेमाणे
पुणे/मुंबई : 9 जून २०२५ : मालाड परिसरात दुधाच्या टँकरमधून मोठ्या प्रमाणावर दूध चोरी करून त्यात पाणी मिसळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चालक, क्लीनर आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोशी पोलिसांनी या चौघांवर फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.
तक्रारदार तेजप्रताप सिंह हे मालाड येथे डेअरी व्यवसाय करतात. ते मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणावर म्हशीचे दूध मागवतात, जे प्रथम वसई येथील डेअरीला पाठवले जाते आणि नंतर त्यांच्या दोन खासगी टँकरद्वारे मुंबईतील विविध भागात पुरवले जाते. याच टँकरवर काम करणाऱ्या चालक आणि क्लीनरने हे दूध चोरी करून त्यात पाणी मिसळल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वसईहून येणाऱ्या दुधात कमतरता जाणवत असल्याने सिंह यांनी टँकरचे जीपीएस लोकेशन तपासले. त्यात टँकर मालाड पूर्वेतील एका अनधिकृत ठिकाणी थांबत असल्याचे आढळले. यावरून संशय वाढल्याने त्यांनी स्वतः चौकशी सुरू केली.
४ आणि ५ जून रोजी जंगबहादूर आणि आकाश या चालक-क्लीनरने वसईहून दूध घेऊन आल्यानंतर त्यात १६० लिटर दूध चोरून एका ठिकाणी वितरित केले आणि त्याऐवजी तितकेच पाणी टाकले होते. याची माहिती सिंह यांना मिळाल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले.
६ जून रोजी पुन्हा असेच प्रकरण घडल्यावर सिंह यांनी दुसऱ्या आरोपी सुरेंद्र आणि राजेश यांना रंगेहाथ पकडले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. चारही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.